कल्याण : भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहरातील सीकेपी संस्थेने भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्टा स्थापन केला आहे. त्याचा शुभारंभ पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिरात २२ जानेवारीला होणार आहे, अशी माहिती कट्ट्याचे अध्यक्ष तुषार राजे यांनी दिली आहे.कट्ट्याचे सचिव मेघन गुप्ते हे नाट्य चळवळीत ४५ वर्षे सक्रीय आहेत. ते साहित्य सम्राट शेक्सपिअर यांच्या गावी २०१४ मध्ये गेले होते. तेव्हा त्यांना गडकरी यांच्या नावाने कट्टा सुरू करण्याची कल्पना सुचली. गडकरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कट्टा स्थापन झाला आहे.गडकरी यांचा जन्म गुजरातमध्ये नवरासी येथे झाला. गुजरातीतून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुण्यात आले. काही काळ त्यांचे वास्तव्य कर्जत येथे होते. त्यानंतर काही काळ ते कल्याण शिवाजी चौकातील एका जुन्या शाळीत राहत होते. त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचा नावाचा कट्टा सुरू करणे, हे फार मोठे औचित्य आहे. बालगंधर्व रंग मंदिरात २२ जानेवारीला या कट्ट्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर २३ ला काळा तलाव येथे एक कार्यक्रम घेतला जाणार आहे. कट्ट्यावर त्यांच्या नाटकाचे अभिवाचन, उतारा वाचन, त्यांच्या कवितेचे रसग्रहण केले जाईल. गडकरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य नाट्य एकांकीका स्पर्धा तसेच दर तीन महिन्यांनी मोठा कार्यक्रमही होणार आहे. काळा तलाव येथे कट्ट्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहे.
राम गणेश गडकरी कट्ट्याचा पुण्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:00 AM