राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचे ठाण्यात तीव्र पडसाद, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:05 PM2018-09-05T16:05:56+5:302018-09-05T16:08:50+5:30
भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांना कदम यांच्या फोटोला चपला मार आंदोलन केले. तसेच त्यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अशी मागणी सुध्दा केली.
ठाणे - भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या व्यक्तव्याचे बुधवारी ठाण्यात तीव्र स्वरुपात पडसाद उमटले. ठाणे शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांचा निषेध करीत त्यांना बांगड्याचा आहेर भेट म्हणून देण्यात आला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सुध्दा कदम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
दहीहांडी उत्सवाच्या दिवशी तुम्हाला पंसत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हांला देईन असे काहीसे वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार राम कदम यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या व्यक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर पडू लागले आहेत. ठाण्यातही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या महिलांनी राम कदम यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून कदम यांना बांगड्यांचा आहेर पाठवून अनोखे आंदोलन केले. यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा संगीता वीरधवल घाग, सुप्रिया पाटील, महासचिव अनघा कोकणे, आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चप्पल काढून मारावे वाटते.अशा संतप्त प्रतिक्रि या महिला वर्गाने व्यक्त केल्या. तसेच फक्त माफी चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आणि महिलांनी राम कदम यांच्या फोटोला चपलांचा मार दिला. तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासले. तर कदम यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना ठाणे शहरात पाय टाकू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.