नितिन पंडीत
भिवंडी - सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट पसरल्याने सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेसह शेत माल व फळ विक्रीला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर येथुन भिवंडीतील मुस्लिम बहुल शहरात रमजान सणात तयार केलेले विशिष्ट जातीचे कलिंगड विक्रीसाठी घेऊन आला होता. या तरुण व प्रगतशील सुशिक्षित शेतकऱ्याचे कलिंगड चार पाच दिवस उलटून देखील विक्री झाली नसल्याने तरुणाची मेहनत वाया जाऊ नये म्हणून या तरुण प्रगतशील शेतकऱ्याकडून सर्वच्या सर्व तब्बल दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेऊन तरुण होतकरू शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न भिवंडीतील मुस्लिम व्यापाऱ्याने केला आहे.
मुस्लिम व्यापाऱ्याने हे कलिंगड खरेदी करून या फक्त तरुण शेतकऱ्याला फक्त मदतीचा हातच दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रचिती देखील पाहायला मिळाली आहे. अहमदनगर येथील तरुण व प्रगतशील शेतकरी सुरज भालसिंग यांनी आपल्या दिड एकर शेतात तब्बल सात ते आठ हजार कलिंगडाची रोपे लावून कलिंगडचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कलिंगड आधुनिक व आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पाठविली जाणारी कलिंगड आहेत. आरोही आणि विशाल अशा दोन जातींची हि कलिंगड आहेत. आरोही जातीचे कलिंगड हे वरून हिरवे तर कापल्या नंतर पिवळे तर विशाल या जातीचे कलिंगड हे वरून पिवळे तर कापल्या नंतर लाल अशा प्रकारची वेगवेगळ्या जातीची हि कलिंगड भरपूर पौष्टिक सत्व असलेली आहेत. शेतकरी सूरज भालसिंग यांनी या कलिंगड पिकांसाठी खुप मेहनत घेतली होती. आता ही सर्व कलिंगड बाजारात विकण्यासाठी तयार देखील झाली होती. मात्र, राज्यात कोरोना संकटामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे कलिंगड विकायची कशी आणि कुठे या चिंतेत शेतकरी होते. अखेर रमजान महिना असल्याने भिवंडी सारख्या मुस्लिम बहुल शहरात कलिंगड विकली जातील या आशेवर या शेतकऱ्यांनी अहमदनगर येथून ट्रक भर कलिंगड भिवंडीत विकण्यासाठी आणले होते. मात्र, तीन चार दिवसांपासून कलिंगडांची विक्री होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर भिवंडीतील व्यावसायिक वाहिद खान यांचा या कलिंगडांवर लक्ष गेले व त्यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस केली. भिवंडीत कलिंगड विक्रीसाठ आलेला शेतकरी सुरज भालसिंग हा सुशिक्षित असून शेतीत नवा प्रयोग करावा यासाठी कलिंगडाच्या नव्या जातीचे पीक घेतले मात्र लॉकडाऊनमुळे आमची सर्व मेहनत वाया जाईल, अशी भीती तरुण शेतकरी सुरज यांनी भिवंडीचे व्यावसायिक वाहिद खान यांच्याकडे व्यक्त केली. अखेर वाहिद खान यांना या तरुण शेतकऱ्यांचा कळवळा आल्याने त्यांनी तरुण शेतकऱ्यांची सर्वच्या सर्व दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेतली. भिवंडीत आणलेल्या कलिंगडसाठी सुरज यांना ९० ते ९५ हजार भाव येणे अपेक्षित असतांना वाहिद यांनी सूरज यांना या सर्व कलिंगडाची दोन लाखपेक्षा अधिक रक्कम देऊन ही सर्व कलिंगड खरेदी केली. व्यवसायिक वाहिद यांनी सर्व कलिंगड खरेदी करून या तरुण शेतकऱ्यांना मदतीचा हातच नव्हे तर ऐन लॉकडाऊन व रमजान महिन्यात हिंदू मुस्लिम एकात्मता दाखवून दिली व सर्व कलिंगड खरेदी केल्याने शेतकरी सूरज यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
दरम्यान, शेतीत काहीतरी नवीन उपक्रम राबवावे यासाठी कलिंगडाच्या नव्या जातीचे पीक घेतले , त्यासाठी खूप मेहनत देखील घेतली मात्र लॉकडाऊन मुळे सर्व वाया जाणार म्हणून भिवंडीत आलो आणि वाहिद खान यांनी चढ्या भावाने सर्व कलिंगड खरेदी केल्याने खुच आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया अहमदनगर येथी तरुण शेतकरी सुरज भालसिंग यांनी दिली आहे. तर चार दिवसांपासून हि कलिंगड आणि या शेतकऱ्यांना मी पाहतो आहे मात्र त्यांच्या कलिंगडाची विक्री होत नसल्याने या तरुण शेतकऱ्यांकडे विचारपूस केली असता हे तरुण सुशिक्षित शेतकरी असल्याचे समजले त्यांनी मेहनतीने शेती करून कलिंगडाचे पीक घेतले असल्याचे समजले. मात्र लॉकडून मुळे त्यांच्या मालाची विक्री होत नसल्याने मी त्यांचे सर्व कलिंगड खरेदी केली आहे, माझ्या या छोट्याशा मदतीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले यातच मला समाधान मिळाले असून तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे. सध्या पवित्र रमजान सण सुरु आहे त्यातच कोरोनामुळे शहरात पोलीस दिवस रात्र मेहनत करत आहेत त्यामुळे हि सर्व कलिंगड मी गरीब गरजूंना व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करणार आहे अशी प्रतिक्रिया व्यावसायिक वाहिद खान यांनी दिली आहे.