ठाणे : भारतीयांच्या श्रद्धास्थानी असलेल्या रामायण आणि महाभारत या महान ग्रंथांचे वाचक चीनमध्येही आहेत. इतकेच नव्हे तर चीनमधील लोकांमध्ये रामायण, महाभारताबद्दल आजही औत्सुक्य दिसते. याचे श्रेय या महान ग्रंथांच्या अनुवादकांना जाते, असे मत संस्कृत भाषेचे चिनी अभ्यासक आणि शांघाय येथील फ्युडन विद्यापीठाचे प्रा.डॉ. झेन लिऊ यांनी ठाण्यात व्यक्त केले.जोशी-बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी आणि संस्कृत विभागांनी ‘संयुक्तपणे चीनमध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यान आयोजित केले होते. कात्यायन सभागृहात हे व्याख्यान रंगले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्कृत भाषा काहींना कठीण वाटते. मात्र, एकदा तिची रचना लक्षात आली की, त्यात कठीण काहीच नाही. विशेषत: रामायण, महाभारताबरोबरच जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे अनेक महान ग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले आहेत. त्यांचे महत्त्व जाणून प्रा. झियानलीनजी, बाओशंग हुआंग, धर्मानंद कोसंबी, प्रबोधकुमार बागची आदी लेखकांनी चिनी भाषेत अनुवाद केले. या अनुवादांचा चीनमधील लोकांना खूप फायदा झाला. विसाव्या शतकात तर चीनमध्ये संस्कृतसंदर्भात अध्ययन आणि अध्यापन मोठ्या प्रमाणात झाले. आता पेकिंग आणि फ्युडन विद्यापीठ ही दोन्ही ठिकाणे संस्कृत अभ्यासाची महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित होत असून विद्यार्थ्यांतही संस्कृत शिकण्याबाबत आवड निर्माण होत असल्याचे लिऊ या वेळी म्हणाले. या संस्कृत अभ्यासाची पुढील दिशा बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन हस्तलिखितांकडून वेदवाङ्मय, प्राकृत अध्ययन आणि भारतीय कलांचा अभ्यास अशी असणार आहे, असेही लिऊ यांनी सांगितले.या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय बेडेकर उपस्थित होते. जागतिक पातळीवर संस्कृत भाषेचे महत्त्व वाढते आहे, याबाबत बेडेकर यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रमोद खराटे, संस्कृत विभागप्रमुख स्वाती भालेराव उपस्थित होते.
चीनमध्ये रामायण-महाभारताची आजही क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:35 AM