कल्याण : केडीएमसीच्या रामबाग खडक प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी तसेच युवासेनेचे पदाधिकारी प्रशांत पाटील यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, शुक्रवारी पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्याबाबत अर्ज दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. दरम्यान, अर्ज छाननी प्रक्रियेत बासरे यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.
पाटील यांच्या माघारीमुळे २३ जूनला होणारी पोटनिवडणूक टळली आहे. गुरुवारी बासरे आणि पाटील या दोघांचेच अर्ज दाखल झाले होते. त्यात पाटील अर्ज मागे घेतील, असे सेनेने स्पष्ट केल्याने बासरे यांची निवड बिनविरोध होणार, हे निश्चित झाले होते.
अखेर, पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नितीन महाजन यांच्याकडे उमेदवारी माघारी घेण्यासाठी अर्ज सादर केला. यावेळी पाटील यांच्यासह माजी नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप, रवी पाटील, गणेश जाधव, युतीचे उमेदवार सचिन बासरे स्वत: उपस्थित होते. यासंदर्भात डॉ. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्याचा अर्ज दिला असून आम्ही तो स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले.
उल्हासनगर, कल्याणमध्ये युतीच : उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना, भाजपने एकमेकांच्या विरोधात लढवली होती. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी होणारी युती पाहता दोन्ही महापालिकांमध्ये होणाºया पोटनिवडणुकांमध्ये युतीचाच उमेदवार उभा करण्याचा निर्णय संबंधित पक्षाने घेतला आहे. उल्हासनगरमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर कल्याणमध्ये शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.