ठाणे : मित्रासाठी धावून गेलेला काशिमीरा येथील टॅक्सीचालक अब्दुल्ला शेख (३१) हा पोलीस चौकशीत बांगलादेशी असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ ओढावली आहे. अब्दुल्लाला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून त्याचा मित्र शेमुल याचा भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर-४ येथील हनुमान कॉलनी, आशेळेगाव येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने गुरुवारी छापा टाकून, पाच ते सहा वर्षांपासून घुसखोरी करून भारतात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असलेले जहीर अन्नार मंडोले (२८) आणि शेमुल दाऊद खान (२६) या दोघांना अटक केली. त्यावेळी जहीरकडे भारतीय पासपोर्ट मिळाला होता. शेमुलकडे भारतीय पासपोर्ट असून तो त्याचा काशिमीरा येथील मित्र अब्दुल्ला शेख याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, त्याने अब्दुल्ला याला पासपोर्ट घेऊन बोलवले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तोदेखील बांगलादेशी नागरिक असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनपरवाना, बँकेचे एटीएमकार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याचे आईवडीलही बांगलादेशी असून ते दोघे विभक्त झाल्यावर अब्दुल्ला काशिमीरा येथे वास्तव्यास होता. यादरम्यान त्याची ओळख पेंटर असलेल्या शेमुलशी झाली होती. शेमुल याचेही त्याच्या पत्नीशी भांडण झाल्यावर घरातील काही साहित्य त्याने अब्दुल्लाकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यात भारतीय पासपोर्टही होता. तो पासपोर्ट पोलिसांना देण्यासाठी अब्दुल्ला आला आणि चौकशीदरम्यान त्याला अटक केली. जहीर आणि शेमुल या दोघांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अब्दुल्ला याला ३ मार्चपर्यंत कोठडी मिळाली आहे.नातेवाइकांचा शोध घेणारअब्दुल्लाकडे भारतीय पासपोर्ट असण्याची शक्यता असून त्याचे नातेवाईक येथे वास्तव्यास आहेत का, याचाही तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके तपास करत आहेत.