पंकज रोडेकर / ठाणेकाँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दिवा आणि मुंब्रा परिसरांतील ‘रोड शो’ वा ‘चौक सभांना बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आक्रमक शैलीत भाषण करणाऱ्या, विरोधकांची आपल्या खास कोकणी शैलीत टिंगल करणाऱ्या राणे यांना ऐकण्याकरिता दिव्यातील कोकणी माणूस व मुख्यत्वे युवक व महिला हजर होत्या. दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडवर राणे यांनी पायधूळ झाडली आणि शिवसेनेने कचऱ्यातून पैसा कमावल्याचा आरोप केला.ठाण्याचे प्रभारी असलेले राणे यांच्या स्वागतासाठी सकाळपासून शहरातील काँग्रेस कार्यकर्ते चातकासारखी वाट पाहत होते. आनंदनगर नाक्यावर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राणे यांच्या मोटारींचा ताफा दिसला आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला. हारतुऱ्यांचे सोपस्कार झाल्यावर मोटारींचा ताफा दिव्याच्या दिशेने निघाला. १ वाजण्याच्या सुमारास राणे दिव्यात पोहोचले. दिवा रेल्वे स्टेशन परिसरातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असणाऱ्या उमेदवाराच्या कार्यालयासमोर उभारलेल्या छोट्या स्टेजवर राणे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी खास शैलीत मतदारांना पंजासमोरचे बटण दाबण्याचे आवाहन केले. दिव्यात कोकणी लोकवस्ती जास्त असल्याने त्यांनी तेथे कोकणाच्या विकासाबाबत आठवण काढली. आपण मंत्री असताना कोकणाचा विकास केला, त्याचप्रमाणे ठाणे आणि दिव्यात विकास करण्यासाठी संधी मागितली. दिव्यातील रहिवाशांचा श्वास गुदमरून टाकणाऱ्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन राणे उभे राहिले. तेथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधायला सुरुवात केली. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. केंद्रात आणि राज्यातील सत्तेत ते एकत्र आहेत. मग, ही नाटके कशाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिव्यात मत मागण्यासाठी आले. मग, सव्वादोन वर्षांत त्यांना दिव्यात का यावेसे वाटले नाही? मुंबईतून हेलिकॉप्टरने १० मिनिटांत ते येऊ शकले असते, राणे बोलले.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फक्त निवडणूक आली की, बाहेर फिरतात. एरव्ही, लोक कसे जगतात, याच्याशी त्यांना काही देणेघेणे नसल्याचा आरोप राणे यांनी केला. अर्ध्या तासात दिव्याला भेट देऊन राणेंचा ताफा मुंब्रा-कौसाच्या दिशेला वळला. दिव्यातील वाहतूककोंडीत काही काळ राणे अडकले. मुंब्रा-कौसातील रशीद कम्पाउंड येथे राणे ओपन जीपमध्ये उभे राहिले. मुस्लिम लोकवस्ती असलेल्या या परिसरात राणे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. अमृतनगर येथे दोन चौकसभा घेतल्या. या ठिकाणी त्यांनी आपल्या खास कोकणी लहेजातील हिंदी भाषेत भाषण दिले. ‘अच्छा दिन लाने का वायदा करनेवाले बीजेपीनी लोगो को गाजर दिखाया. ये सरकारने अभी तक एक भी आश्वासन पुरा किया है क्या’, असा सवाल राणे यांनी केला.
वाहतूककोंडीचा राणे यांनाही फटका
By admin | Published: February 16, 2017 1:54 AM