कल्याण : राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची आणि कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. हाच प्रत्यय मंगळवारी डोंबिवलीत पार पडलेल्या महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्य़ात आला. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि खासदारांनीही त्यांना कानपिचक्या देत सडेतोड प्रत्युत्तर दिले. राजकीय टीकाटिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे विकासकामांच्या या लोकार्पण सोहळ्यात चांगलीच रंगत आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार रवींद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांसह भारत माता की जय, अशा घोषणा देत सावित्रीबाई नाट्यगृहात शिरले. त्याचवेळी भाजप कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी राडा करणार, याचा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी आमदारांना समजही दिली. मात्र, आमदारांनी भाषण करण्याचा आग्रह धरला. कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांनी भाषण केले. यावेळी चव्हाण म्हणाले की, शिवसेना, भाजपचा कार्यकर्ता वेगळा आहे. आम्ही सत्तेत नाही. मात्र, आमचा हिंदुत्वाचा एकच मुद्दा आहे, असे ते म्हणाले. रस्ते विकासासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४७२ कोटी रुपये दिले होते. ते मागे पडले असून नव्याने ३६० कोटी एमएमआरडीएने मंजूर केले आहेत. मग ४७२ कोटी रुपयांच्या निधीचे काय झाले. कल्याण शीळ रस्त्याचे काम ग्रामपंचायतीच्या रस्त्याप्रमाणे सुरू आहे. कोरोनाकाळातही कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांकडून घनकचरा शुल्काची वसुली केली जात असल्याचे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ घोषणा देऊन आणि नारळ फोडून काही होत नाही. कामे मार्गी लावणे, हे महत्त्वाचे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी साडेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. तो अनुशेष का भरला नाही, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची ऑनलाइन उपस्थिती होती. तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला त्यांचा आवाज येत नव्हता. त्यावर मिस्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले की, ऑनलाइन कनेक्शन लूज असले तरी, पाटील आणि माझ्यातील कनेक्शन स्ट्राँग आहे. त्यावर पाटील म्हणाले की, रवी चव्हाणांशी कनेक्शन लूज आहे, ते थोडं टाईट करा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी टेस्टर घेऊन बघतो, असे मिस्किल वक्तव्य केले.
या सगळ्य़ाचा समाचार घेताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एखाद्या चांगल्या कार्यक्रमात येताना राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजेत. एका विशिष्ट विभागासाठी निधीचा हट्टाहास धरू नये. सगळ्य़ा शहरातील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवाच. घनकचरा कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो कल्याण डोंबिवलीने अमलात आणला आहे. नागरिकांकडून कर वसूल केला तर त्याच पैशातून सोयीसुविधाही दिल्या जाणार आहेत. हाच कर भाजपची सत्ता असलेल्या पनवेल आणि मीरा भाईंदर महापालिकांमध्येही वसूल केला जात आहे. तिथे हा मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तुमच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही घोषणा देऊ शकतो, अशा शब्दांत त्यांनी चव्हाणांना सुनावले.
------------------------------