ठाणे : ब्रह्मांड कट्ट्याने रविवारी संध्याकाळी केलेल्या मोफत संगीत कार्यशाळेत कान-नाक-घसा व आवाजतज्ज्ञ डॉ. अनघा जोशी यांनी मार्गदर्शन केले. श्वासावर नियंत्रण, डायाफ्रामॅटिक श्वासोच्छ्वास, गायनासाठी स्वतःची पट्टी ठरवणे, पट्टीची क्षमता वाढविणे, आवाजातील रेजोनेंस वाढवणे, आवाजाचे व्यायाम याविषयी सखोल माहिती दिली. तसेच वार्धक्य, मासिक पाळी, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांचा आवाजावर कसा परिणाम होतो, यांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.
ऋजुता देशपांडे यांनी तांत्रिक तसेच सूत्रसंचालनाची दुहेरी बाजू सांभाळली. मुलाखतीद्वारे जोशी यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास उलगडला. डॉ. जोशी यांनी स्लाइड शोच्या सहाय्याने कंठाची रचना व आवाजासंबंधित अनेक बाबींवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. भारताबाहेरूनदेखील कार्यशाळेत सदस्य सहभागी झाले होते. प्रश्नोत्तरांच्या सत्रात रसिकांनी सक्रिय सहभाग दर्शवून तज्ज्ञांकडून प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी आभार मानले.