शेणवा : राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या डोळखांब आदिवासी ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तळवाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाºया रोडवहाल या आदिवासी गावात टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ६०० च्या आसपास लोकसंख्या असून ९८ घरांची वस्ती असणाºया या गावात पाणीच मिळत नाही. एक महिन्यापूर्वी पाण्यासाठी साली पिल्लू झुगरे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. परंतु, लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्षच देत नसल्याने हे भयानक प्रकरण उजेडात आले नाही.
२००४ मध्ये या ठिकाणी पाणीयोजना मंजूर झाली होती. एक कोटीची असणारी ही योजना एकच दिवस पाणी देऊन कायमची बंद झाली. या ठिकाणी दोन कूपनलिका आहेत. एक खाजगी मालकीची आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावासाठी दिली आहे. परंतु, सध्या या ठिकाणची भूजल पातळी इतकी खालावली आहे की, एक तास हपासल्यानंतर या कूपनलिकेला पाणी सुरू होते. पहाटे ३ वाजता महिलांना पाण्यासाठी नंबर लावावा लागतो. पहाटे गेलेली महिला सकाळी ८ वाजता दोन हंडे पाण्याचे घेऊन येते. तेवढेच पाणी संपूर्ण दिवस पिण्यासाठी वापरतात.
अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी पाच किलोमीटरवर असणाºया डोळखांब येथील चोर नदीवर जावे लागते. दोन वर्षांपासून या ठिकाणी टँकरच आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कूपनलिका आहेत तरीही त्यासाठी दोन हंडे पाण्यासाठी पाच तास रांग लावावी लागते. चार महिला कूपनलिका हपसायला लागतात. तर, अजून १० दिवसांनी आम्हाला सात किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी जावे लागणार असल्याचे ज्योती खाकर यांनी सांगितले.
पेंढरघोळ येथील विहिरीला मिळाला जलस्रोतगेल्या वर्षी लवकर गेलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत शोधणे, हे मोठे आव्हान आहे. तरीही, सध्या पेंढरघोळ येथे बांधण्यात येणाऱ्या विहिरीला अनेक जलस्रोत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर विषयाबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळदाह’च्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची गंभीर दखल लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.
पाऊस गेल्याने पाण्याची पातळी खालावली आणि तालुक्यातील विहिरीदेखील आटल्या. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. पेंढरघोळ येथे निर्माण झालेली ही पाणीसमस्या कायमची सुटावी, म्हणून गेल्या वर्षी मंजूर झालेल्या जलकुंभाचे काम दोन दिवसांपूर्वीच लघुपाटबंधारे विभागाकडून हाती घेण्यात आले. दिवसरात्र हे खोदकाम सुरू असून ३० फुटांवरच पाण्याचे अनेक झरे लागल्याने नागरिकांसह अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या कडक उन्हातही लागलेले हे झरे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देतील, असे जाणकार सांगतात. ३३ फूट खोल आणि साडेतेरा मीटर रुंदीचा हा जलकुंभ १७ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत आहेत. या जलकुंभाच्या पाण्यामुळे येथे असलेल्या आश्रमशाळेबरोबरच इतर दोन पाड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या जलकुंभाचे खोदकाम सुरू असतानाच पाण्याचे झरे लागल्याने आम्ही नक्कीच समाधानी आहोत. हे पाणी गावपाडे यांना टंचाईच्या काळात नक्कीच उपयोगी ठरेल असे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.आर. तडवी यांनी सांगितले.