बदलापूर : बदलापूरमध्ये भीम महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारोंच्या गर्दीत रंगलेल्या या महोत्सवात राजकीय पक्षभेद विसरून सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज एकवटल्याचे चित्र निर्माण झाले होते. बदलापूर शहर व ग्रामीण बौद्ध समाजाच्या वतीने भीम महोत्सव नुकताच बदलापूर पश्चिमेकडील घोरपडे मैदानात झाला. या महोत्सवात आरपीआय,भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेक्युलर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील बौद्ध समाजाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन चळवळीतील मुंबई ,ठाणे, कल्याण परिसरातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच बहुजन समाजातील बदलापूर शहर व परिसरातील कार्यकर्तेही या महोत्सवाला उपस्थित होते. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, कर्जतच्या नगराध्यक्ष रजनी गायकवाड, बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे, गटनेते श्रीधर पाटील, पाणी पुरवठा समिती सभापती सूरज मुठे, संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग पवार, भारतीय मानवाधिकार परिषदेचे कल्याण जिल्हाध्यक्ष संजय साळवे आदींनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात मनोगत व्यक्त करताना मुख्य निमंत्रक प्रवीण राऊत यांनी यापुढे दरवर्षी बदलापूरमध्ये भीम महोत्सव भरवणार असल्याचे सांगून लवकरच बदलापूरमध्ये बौद्ध समाजाचे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर समाजावर अन्याय झाल्यास समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या गीतांचा कार्यक्र म महोत्सवाचे आकर्षण ठरले. (प्रतिनिधी)
बदलापूरमध्ये रंगला भीम महोत्सव
By admin | Published: February 15, 2017 4:35 AM