- नितिन पंडितभिवंडी : भिवंडीतील महापोली येथे रविवारी दुपारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पदांवरुन रंगलेल्या कार्यकर्त्यांच्या नाट्यमय वादावर आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत, मला अंधारात ठेऊन काही करू नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांना समज दिली.राष्ट्रवादीच्या भिवंडी ग्रामिण शाखेच्या वतीने आव्हाड यांचा नागरी सत्कार रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात व्यासपिठावरच तूतूमैमै सुरु झाली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सध्या प्रदेश सरचिटणीस पदावर असलेल्या पिसाळांना जिल्हाध्यक्ष पदाचा मोह अनावर झाला आहे. यावरुनच सध्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या तिवरे यांच्याशी त्यांची तूतूमैमै सुरु झाली. आव्हाड अध्यक्षीय भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आले असता, तिवरे यांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवून माईकचा ताबा घेतला. आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी पिसाळांवर जाहीर टीका केली. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यावर आव्हाड यांनी टीका केली. दुसऱ्याच्या कार्यक्र मात येऊन कशाला घाण करता, अशा शब्दात त्यांनी पिसाळांना समज दिली. जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. तुमच्याकडे जे ऐश्वर्य आहे, ते केवळ कार्यकर्त्यांमुळे, अशा शब्दात त्यांनी तिवरेंनाही सुनावले. पदांसाठी भांडू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.दरम्यान, सध्या केंद्र शासनाने लागू केलेल्या सीएए , एनआरसी कायद्याला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहील. मात्र २0१0 च्या एनपीआर कायद्याला आमचे समर्थन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार दौलत दरोडा, भिवंडी शहर अध्यक्ष भगवान टावरे, महिला अध्यक्षा स्वाती कांबळे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, जिल्हा उपाध्यक्ष महादेव चौघुले, जिल्हा सचिव महेंद्र पाटील, अनिल पाटील, कैलास घरत, मोनिका मढवी आदी उपस्थित होते.गणेश नाईकांवर सडकून टिकाअडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सडकून टिका केली. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडविला असेल, तर त्याचे नाव गणेश नाईक आहे, अशी टीकाही त्यांनी नाईकांवर याप्रसंगी केली. राष्ट्रवादी सोडून गेलेले भाजपचे खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.
आव्हाड यांच्या सत्कार सोहळ्यात रंगला पदांचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:42 PM