लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये विजय हजारे स्पर्धेनंतर आता तब्बल २५ वर्षांनंतर रणजी क्रिकेटचा धुरळा उडणार आहे. १३ जानेवारीपासून देशांतर्गत क्रिकेटमधील या सर्वोच्च स्पर्धेचे सामने ठाणेकरांना मोफत पाहता यावेत, यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.
ठाण्यात १९८२ मध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम बांधण्यात आले. त्यानंतर ४ वर्षांनी १९८६ मध्ये पहिल्यांदा येथे रणजीचे सामने खेळविण्यात आले होते. त्यानंतर १० वर्षांनंतर १९९६ मध्ये याठिकाणी रणजीचे सामने झाले. प्रथम श्रेणी क्रिकेटबाबत बीसीसीआयचे नियम बदलले आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम अडगळीत गेले. आता महापालिकेने स्टेडियममध्ये अंतर्गत कामे केल्यानंतर सुमारे २५ वर्षांनंतर हे स्टेडियम प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी सज्ज झाले आहे. याच स्टेडियमवर नुकताच विजय हजारे चषक स्पर्धेचे सामने खेळविण्यात आले. आता १३, २० आणि २७ जानेवारी २०२२ आणि ३ व १० फेब्रुवारी रोजी पाच रणजी सामने खेळविले जातील.
आनंदाची बाब म्हणजे ठाणेकरांना हे सामने विनामूल्य पाहता येतील. त्यामुळे ठाणेकरांना हजारे चषकाचे सामने पाहता आले नव्हते, त्याची कसर रणजी सामन्यात भरून निघणार आहे. येत्या नव्या वर्षात रणजी स्पर्धेचे पाच सामने ठाण्यात रंगतील. येथील आऊट फिल्ड आणि पिचचे काम चांगले झाल्याने पुन्हा या स्टेडियमवर रणजीचे सामने होत आहेत. १३ जानेवारीला पहिला सामना होणार असून, त्यानंतर आणखी चार सामने येथे होतील. - मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठामपा