ठाणे : प्रशासनाकडून रेशनकार्ड आधारला लिंक केली आहेत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात कृती झालेली नाही. त्यामुळे जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात गुरु वारी आ. जितेंद्र आव्हाड, शिधावाटप, पुरवठा अधिकारी, दुकानदार आणि शिधा पत्रिका धारकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. यामध्ये अधिकाऱ्यांनी ८५ टक्के शिधा पत्रिका आधारशी लिंक केल्याचे सांगितले. मात्र, दुकानदारांनीच हा मुद्दा खोडून काढल्यामुळे प्रशासन तोंडावर पडले. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जनतेचा रोष सहन करावा लागत असल्याने ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील शिधावाटप दुकानदारांनी १८ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा दिला. तर, आगामी १५ दिवसांत हा घोळ आटोपून धान्य न दिल्यास आपण पुढाकार घेऊन शिधावाटप दुकाने लुटून जनतेला ते उपलब्ध करून देऊ, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.आधारकार्ड हे रेशनिंग कार्डशी लिंक न केल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी रेशनिगंवर धान्य उपलब्ध झालेले नाही. हे लक्षात घेऊन ९ एप्रिल रोजी आव्हाडांनी रेशनिंग आॅफीसवर आंदोलनही केले होते. त्यानुसार गुरुवारच्या बैठकीला जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरविंद मोरे, नगरसेविका राधा जाधवर, पुरवठा अधिकारी वंजारी, शिधावाटप अधिकारी पळसकर आणि शिधावाटप दुकानदार उपस्थित होते. दुकानदारांनीही बायमेट्रीक प्रक्रि या पूर्ण न झाल्याचे सांगून शिधावाटप अधिकाºयांचे पितळ उघडे पाडून प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे धान्य मिळत नसल्याने येत्या १८ तारखेपासून सर्व दुकानदार बेमुदत संपावर जात असल्याचे जाहीर केले.
‘... तर १५ दिवसांत रेशन दुकाने लुटणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 3:06 AM