कल्याण : एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन ५० लाखांची मागितल्याप्रकरणी ओमी कलानींसह आठ आरोपींविरुद्ध कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली असून, हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावा कलानी यांनी केला.डोंबिवली पुर्वेतील तक्रारदार व्यापारी अहमदाबाद येथील निलेश नामक व्यापाºयाकडून कपडे विकत घेऊन ते विकण्याचा व्यवसाय करतात. या व्यवहारात तेथील व्यापारी सुरेश लालवाणी यांची मध्यस्थी असते. रविवारी सुरेशने तक्रारदारास पैशाची मागणी केली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर सुरेशने चाकूच्या धाकावर त्याला उल्हासनगर ५ येथील एका दुकानात नेले. त्यानंतर निलेश यांना भेटण्यासाठी मुंबई विमानतळावर नेले. तिथे त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरुन वाद झाला. त्यानंतर तक्रारदार आणि लालवाणी उल्हासनगर येथील एका हॉटेलमध्ये गेले. तिथे सनी तेलकर, गुडडु राय, विकी पंजाबी, विजय शिंदे आणि अन्य तीन ते चार जण उभे होते. त्यांनी ५० लाखांची मागणी केली. यावेळी विजय शिंदे याने रिव्हॉल्व्हर तर गुडडुने चाकूचा धाक दाखवत धमकी दिली. त्यानंतर ‘अध्यक्ष टिम ओमी कलानी’ असे लिहिलेल्या गाडीत बसवून फर्निचर बाजार येथील एका हॉटेलमध्ये मारहाण केली.>तक्रारदाराला सोमवारी ओमी कलानींच्या बंगल्याजवळ नेण्यात आले. तीन दिवसात ५० लाख दे, अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवू अशी धमकी दिल्यानंतर आरोपींनी आपणास सोडल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ओमी कलानी यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. विरोधकांनी आपल्याविरुद्ध रचलेल्या राजकीय षडयंत्राचा हा भाग आहे. सर्व आरोप धादांत खोटे असल्याचा दावाही कलानी यांनी केला.
ओमी कलानींविरुद्ध खंडणी, अपहरणाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:42 AM