भिवंडी - मोहम्मद आरीफ अन्सारी (३६) याचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास करण्याकरिता कबरस्तानातून त्याचा मृतदेह बाहेर काढून तो मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अन्सारी याचा मेहुणा निसार हा अन्सारीच्या हत्येच्या प्रकरणात गुंतवून खंडणी वसूल करत असल्याची तक्रार पोलिसांकडे आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला.अन्सारी, त्याचा मेहुणा निसार, सलीम व विजय यादव हे बालाजीनगरमध्ये ताडी पिण्याकरिता गेले होते. तेथे अन्सारी व सलीम यांच्यामध्ये बाचाबाची झाली व अचानक अन्सारी बेशुद्ध झाला. त्यामुळे त्यास सलीमनेच जवळ असलेल्या डॉ. अब्दुल समद यांच्या दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी अन्सारी मृत झाल्याचे जाहीर केले. ही घटना ८ जुलै रोजी घडली. अन्सारीच्या कुटुंबीयांनी त्याच रात्री त्याचा मृतदेह कबरस्तानात पुरला. दुसऱ्या दिवशी अन्सारीचा मेहुणा निसार याने विजय यादव याला बालाजीनगर येथील खोलीत कोंडून ठेवून तुला हत्येच्या गुन्ह्यात अडकवीन, अशी धमकी दिली. निसार याने यादवकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. यादवने एक लाखाचा चेक व नातेवाइकांकडून २५ हजार रुपये आणून निसार याला दिले. मात्र, १० जुलै रोजी निसार याने यादवला गाठून एक लाख रुपये रोख देण्याचा तगादा लावला. यादवने भोईवाडा पोलिसात निसारविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला.१६ जुलैपर्यंत कोठडीपोलिसांनी निसारविरोधात गुन्हा दाखल करून त्यास सापळा रचून अटक केली. त्यामुळे अन्सारीची हत्या केली की, नैसर्गिक मृत्यू झाला, असा प्रश्न निर्माण झाला असून याचा शोध घेण्यासाठी कबरस्तानातील मृतदेह बाहेर काढून तो जे.जे. रुग्णालयात शवचिकित्सेकरिता धाडला आहे. निसार याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खंडणीमुळे हत्येचा छडा लागणार? अन्सारीच्या मृत्यूचे गूढ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:17 AM