भिवंडी : साेळावर्षीय मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, पीडित मुलगी व आरोपी हे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याने ही घटना समजताच नागरिकांनी मंगळवारी रात्री उशिरा रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भिवंडी पोलिसांनी वातावरण शांत केले.
भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाणे क्षेत्रातील एक चाळीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अपहृत मुलगी अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तीन पथके बनवून तपास सुरू केला. पीडितेच्या पालकांकडे चौकशी केली असता सुशीलकुमार संतोष सोनी (वय २८, रा. हंडी कम्पाउंंड) व इरशाद इलियास अन्सारी (वय ४८, रा. दिवाणशाह दर्गा) या दोन पानपट्टीचालक असलेल्या संशयितांची नावे समोर आली. पोलिसांनी मंगळवारी दोघांची चौकशी केली असता सुशीलकुमार सोनी याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ (जे) सह पोक्सोअन्वयेही गुन्हा दाखल केला.
जनक्षोभ उसळला : आराेपीच्या पानपट्टीची नागरिकांकडून तोडफोडआरोपी व पीडित मुलगी हे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याचे समजताच परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीची दिवाणशाह दर्गा परिसरातील पानपट्टीची तोडफोड केली. त्यानंतर, निजामपुरा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय आवारातील पोलीस कोठडीत ठेवलेल्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी रात्री उशिरा नागिरकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. n कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना या घटनेस वेगळा रंग न देता शांतता राखण्याचे आवाहन केले. दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एन.पी. पवार करीत आहेत.
बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी
भिवंडी : भिवंडीतील अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची, तसेच निकाल सहा महिन्यांच्या आत देऊन पीडितेस न्याय देण्याची मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. n पीडित मुलीचे पालक हे आरोपींच्या दहशतीखाली असल्याने त्यांना संरक्षण देण्यात यावे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि केंद्र तसेच राज्य शासनाच्या संबंधित योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.n गृहमंत्र्यांनी गृह विभागाचे उपसचिव व ठाणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती रईस शेख यांनी दिली