लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तलासरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तलासरी पोलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अत्याचार झाल्यानंतर लगेच मुलीला घेऊन तिचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. पण, तेथील कार्यरत डॉक्टरांनी तिला न तपासता गोळ्या व औषधे देऊन घरी पाठविल्याने संताप व्यक्त होत आहे.
तलासरी तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. १३ वर्षीय शाळकरी मुलीवर १३ तारखेला संध्याकाळी एका नराधमाने अत्याचार केला.
अत्याचारानंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिला घरच्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री आठ वाजता नेले. पण, संध्याकाळ झाल्याने व ओपीडी बंद केल्याने आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तिला न तपासता मुलीने हातपाय व पोट दुखत असल्याचे सांगितल्याने तिला गोळ्या व औषध देऊन घरी पाठविले. पीडित मुलीला डॉक्टरांनी तपासून कारणे विचारली असती तर अत्याचारानंतर लगेच घटना उघडकीस आली असती. पण, डॉक्टरांच्या मनमानी कारभाराचा फटका पीडित मुलीला बसला आहे.
२४ तास मिळत नाही आरोग्यसेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन-तीन दिवस काम करून घरी जातात. यामुळे रुग्णांना २४ तास आरोग्यसेवा मिळत नाही. या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून त्यांनी स्वतः तीन-तीन दिवसांचे काम वाटून घेतले आहे. एका डॉक्टरने तीन दिवस काम केल्यावर त्याने घरी जायचे व दुसऱ्याने आरोग्य केंद्रात यायचे, अशा मनमानी कामामुळे रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्यसेवा मिळत नाही. आठवड्याला तीन दिवस काम करून पगार मात्र पूर्ण घ्यायचा, असेच येथे सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तलासरी पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांसह, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. आदिवासी समाज सोयी सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. तलासरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत कोळी यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.