मीरा रोड : सरकारने डेंग्यूच्या निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करू नये, असे बजावले असतानाही मीरा-भाईंदरमध्ये सर्रास किटचा वापर करून अहवाल दिले जात आहेत.
डेंग्यू चाचणीसाठी शुल्क ६०० रुपयांपेक्षा जास्त आकारू नये, असेही सरकारचे आदेश आहेत. डेंग्यू चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालय आदी मनमानी ८०० ते १५०० रुपये शुल्क आकारणी करीत होते. तसेच रॅपिड किट टेस्टचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी रॅपिड किटचा वापर करू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे. डेंग्यूचे योग्य निदान व्हावे म्हणून एनएस १ एलिसाव मॅकएलिसाया पद्धतीने चाचणी केली जावी. या पद्धतीने योग्य निदान होत असतानाही किट टेस्ट केली जात असून, काही ठिकाणी शुल्क सोयीने आकारले जाते असे सूत्रांनी सांगितले. महापालिकेकडूनच या बेकायदेशीर प्रकारांना पाठीशी घातल्याचा आरोप नागरिक करत आहेत.