कल्याण : पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरातील नागरिकांना काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जवळपास साडेतीनशे कुटुंबे या समस्येने ग्रासली आहेत.मागील काही महिन्यांपासून रोहिदासवाड्यातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेकवेळा धाव घेतली. रोहिदासवाड्यात सुमारे साडेतीनशे कुटुंबे कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाली आहेत. आधीच कमी पाणी पुरवठा होत असून, त्यातच अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याने भरलेले पाणी टाकून देण्याची वेळही नागरिकांवर येते. पालिका प्रशासनाकडून नियमितपणे पाणी बिल पाठवले जाते. पण पाणीटंचाईची समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालिका प्रशासनाकडून या भागात टँकर पाठवला जातो. पाण्याचा टँकर वस्तीत येताच नागरिकांची झुंबड उडते. अनेकांच्या वाटयाला टँकरचे पाणीच येत नाही. टँकरच्या पाण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावून टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सकाळी ९ च्या सुमारास परिसरात येणारे पाणी घराघरात पोहोचेपर्यंत दोन तास निघून जातात. त्यानंतर पाणी भरायला घेतले, तर अर्ध्या तासात पाणी गेलेले असते. कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथ्या शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर दुसºया दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.मारुती मंदिर परिसरात पाणी येत नसल्याने त्याठिकाणी टँकर मागवला जातो. आंबेडकर रोड परिसरात पाणी येत नसल्याने काही महिन्यांपूर्वी केडीएमसीवर मोर्चादेखील काढण्यात आला होता. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली. मात्र, आता परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.- योगेश रोकडे, स्थानिक रहिवासीप्रभागातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या दूर होईल.- शकिला खान,स्थानिक नगरसेविका
रोहिदासवाड्यात तीव्र पाणीटंचाई; कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने नागरिक झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:23 AM