- स्नेहा पावसकरठाणे : ठाणे खाडीला फ्लेमिंगो सागरी अभयारण्य घोषित केल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पाहायला मिळतात. त्याचबरोबर, येथे अनेक दुर्मीळ पक्षीही दृष्टीस पडतात. सहसा युराेपात आढळणाऱ्या तर कधी भारताच्या पूर्व भागात आढळणारे दुर्मीळ कॉमन शेलडक्स (शाही चक्रवाक) हे दोन-तीन दिवसांपूर्वीच ठाणे खाडीत आढळले आहेत. २०१७ नंतर सुमारे चार वर्षांनी पहिल्यांदाच हे ठाणे खाडीत आढळल्याने पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे.महाराष्ट्र शासनाने २०१५ साली ठाणे खाडी फ्लेमिंगो सागरी अभयारण्य घोषित केले व खऱ्या अर्थाने येथील लाखो पक्ष्यांना सुरक्षा व हक्काचे निवास स्थान प्राप्त झाले. नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येथे किमान २५ ते ४० हजार फ्लेमिंगो पाहता येतात व त्यांना पाहण्याकरिता पर्यटकांची रीघ लागते. यंदा कोरोनामुळे बंद केलेली पक्षी पर्यटकांची सफर पुन्हा सुरू केली आहे. ठाणे खाडीत स्थानिक आणि स्थलांतरित पाहुण्यांचीही नोंद होते. यातले अनेक पक्षी दुर्मीळ असतात. कॉमन शेलडक्स हाही एक दुर्मीळ. युरोपात आढळणाऱ्या या बदकाच्या प्रजातीतील पक्ष्यास क्वचित भारताच्या पूर्व प्रदेशातील गजलडोबा येथे पाहता येते, परंतु भारताच्या पश्चिम प्रदेशातील पाणथळ प्रदेशात याच्या फारशा नोंदी नाहीत. २०१७ला १५ दिवसांच्या ठाणे खाडीतील वास्तव्यानंतर मागील आठवड्यात कांदळवन विभागाचे उपसंचालक मानस मांजरेकर यांनी कॉमन शेलडक्सची नोंद केली.हा कॉमन शेलडक्स दुर्मीळ असून, पुढील १० ते १५ दिवस हे पाहुणे येथे दिसू शकतील, असा अंदाज आहे. कांदळवन विभागाचे वनाधिकारी कोकरे, उपजिल्हाधिकारी खुटवड, उपजिल्हाधिकारी कल्पना जगताप, कर्मचारी शाहिद बामणे यांच्यासह केलेल्या पक्षी निरीक्षणात तीन कॉमन शेलडक्स नजरेस पडले.- डॉ. सुधीर गायकवाड, वन्यजीव छायाचित्रकार
युरोपात आढळणारा दुर्मीळ कॉमन शेलडक्स चार वर्षांनी ठाणे खाडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:49 AM