लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे, तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाप्पांचे भक्त शनिवार आणि रविवारी घराबाहेर पडतील, अशी अटकळ बाधून विक्रेत्यांनी दुकानांच्या दर्शनी भागाची सजावट केली होती. परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत बरसलेल्या मुसळधार आणि रविवारी दुपारी बरसलेल्या रिमझिम पावसामुळे मुंब्रा तसेच दिव्यातील बहुतांश नागरिकांनी बाप्पांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचे टाळले. यामुळे या शहरांमधील विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भक्तांची तुरळक गर्दी झाल्याचे दृश्य होते. यामुळे देखाव्यांसाठी तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा हिरमोड झाला. गणेशोत्सवासाठी उरलेल्या पुढील चार दिवसांमध्ये गर्दी होईल, असा आशावाद सुरेश पवार या पूजेचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्याने व्यक्त केला.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने शिथिलता दिली आहे. परंतु मागील जवळपास दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे अनेक जण बेरोजगार झाल्याने त्यांची अर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामुळे यावर्षी परंपरा म्हणून बाप्पांची स्थापना करणारे काटकसर करून उत्सव साजरा करत आहेत. अशातच सजावटीच्या ज्या वस्तूंचे दर वाढले आहेत, त्या खरेदी न करता त्याऐवजी देखाव्यासाठी पर्यायी वस्तूंचा वापर करुन तसेच मोठ्या मूर्तीऐवजी लहान मूूर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा कल वाढला असल्याची माहिती सुशील कापडी या पाच दिवसांसाठी गणेशाची स्थापना करत असलेल्या भक्ताने लोकमतला दिली.