ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात हजेरी लावली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे अशा घोषणा देत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
जवळ जवळ दोन वर्षापूर्वी शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर या दोनही गटाकडून वारंवार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. मागील वर्षी देखील रश्मी ठाकरे ठाण्यात येणार म्हणून शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून त्याचवेळी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर यंदा देखील बुधवारी रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून टेंभी नाक्यावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
सुरुवातीला त्यांनी या भागात असलेल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथे दुर्गेश्वरीची महाआरती केली. या आरतीनंतर महिला पदाधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हा प्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग येथील काही ठिकाणी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर चंदनवाडी शाखेला भेट देत तेथील देवीचे दर्शन घेतले. यावेळी शाखेत त्यांनी जवळ जवळ अर्धा तास महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकूणच विविध मंडळांना भेटी देत त्यांनी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले.