ठाणे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी अद्याप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे ठाण्यात आले नाहीत. मात्र त्या आधीच टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवात ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी हजेरी लावली. यावेळी टेभींनाक्यावर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ठाण्यासह, मुंबई व इतर ठिकाणच्या महिला आघाडीने टेंभीनाक्यावर हजेरी लावून शक्ती प्रदर्शन करीत, उध्दव ठाकरे तुम संघर्ष करो, उध्दव ठाकरे आगे बडो, शिवसेना जिंदाबाद अशा देवीच्या मंडपातच घोषणाबाजी केल्याचे दिसून आले. यावेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची महाआरती करीत सर्वाना सुखी ठेव अशी मागणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या आमदार मनीशा कांयदे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणोकर यांनी आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलो नसल्याचे सांगितले जरी असले तरी शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
रश्मी ठाकरे या महाआरतीसाठी ठाण्यात येणार असल्याने त्याचे नियोजन शिवसेनेच्या पदाधिका:यांकडून आखण्यात आले होते. त्या रात्री येतील अशी शक्यता होती. परंतु याचवेळेस शिंदे गटाच्या महिला आघाडीकडूनही रात्री ८ वाजता महाआरती केली जाईल असे आव्हान देण्यात आल्याने गुरुवारी शिंदे गट आणि ठाकरे गट महिला आघाडी समोरा समोर येतील असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे टेभींनाक्याला पोलीस छावणीचे रुप आले होते. मात्र रश्मी ठाकरे या रात्री न येता त्यांनी दुपारीच दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र देवीच्या दर्शनाला कोणीही येऊ शकते असे शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आल्याने तसेच महिला आघाडीने देखील सामंज्यस्याची भुमिका घेतल्याने होणारा वाद टळल्याचे दिसून आले.
रश्मी ठाकरे येणार म्हणून आमदार मनिषा कायंदे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणोकर आदींसह मुंबईसह ठाण्यातील महिला आघाडी आधीच टेंभीनाक्यावर हजर झाल्याचे दिसून आले. आनंद दिघे यांच्या पुतळ्या जवळ या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. दुसरीकडे रश्मी ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी त्या भावूक झाल्याच्या दिसून आले.
त्यानंतर त्यांनी देवीच्या दर्शनाला हजेरी लावली. यावेळी देवीचा मंडप तसेच बाहेरचा परिसर महिला पदाधिका:यांच्या गर्दीने भरुन गेला होता. तसेच केवळ ठाण्यातील महिला आघाडीच्या महिला नाही तर मुंबई व आजूबाजूच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील बस करुन ठाण्यात आल्या होत्या. त्यानंतर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. परंतु महाआरती झाल्यानंतर शिवसेनेकडून उध्दव ठाकरे तुम संघर्ष करो, उध्दव ठाकरे आगे बडो, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत मंडप परिसरातच या महिलांनी घोषणाबाजी केल्याचे दिसून आले. एकूणच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्यात उध्दव ठाकरे यांनी हजेरी लावण्याआधीच रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावून शिंदे ठाण्यात शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
थापा यांच्या प्रवेशाबाबत फार काही गांर्भीयाने पाहण्याची गरज नाही. यातून एक स्पष्ट होत आहे, बघा आमच्याकडे सर्वच येत आहेत, असा केवीलवाणा प्रयत्न केला जात आहे. विचारांचे वारसदार असते, तर कोर्टात धनुष्यबाण गोठवा, अशी मागणी त्यांनी केली नसती. बाळासाहेब ठाकरे यांनी जे चिन्ह पक्षासाठी घेतले तेच गोठावण्याची मागणी केली नसती. अंबादास दानवे यांनी काय व्यक्तव्य केले, त्याबाबत माहित नाही. मात्र आम्ही कोणाचेही वाईट चिंतण्यासाठी येथे आलेलो नाही. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी राजकारण कशासाठी त्यामुळे येथे राजकारण करण्यासाठी आलेले नाही.- मनिषा कांयदे (आमदार, शिवसेना)
आम्ही येथे कोणत्याही प्रकारचे राजकारण करायला आलेले नाही. यापूर्वी देखील आम्ही येथे देवीच्या दर्शनासाठी येत होतो, आज रश्मी ठाकरे आल्या आहेत. यानंतर उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे देखील दर्शनासाठी येतील. यापूर्वी वेगवेगळे येत होतहोतो. मात्र आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे यात कुठेही राजकारण केलेले नाही.- किशोरी पेडणोकर - माजी महापौर, मुंबई
वाहतुक कोंडीरश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर येणार म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र शकेडो महिलांनी एकाच वेळेस टेंभी नाक्यावर उपस्थिती लावल्याने वाहतुक कोंडी या भागात झाल्याचे दिसून आले. वाहनांचा वेग मंदावल्याचे दिसून आले. तर रश्मी ठाकरे आल्याने दर्शनासाठी उन्हा तान्हात उभी असलेली भक्तांची रांगही जवळ जवळ पाऊण तास थांबविण्यात आल्याचे दिसून आले.