अजित मांडके, ठाणे मागील पाच राष्ट्रपती आणि भविष्यातील पाच राष्ट्रपती यांना विदेश दौऱ्यावर गेल्यावर किंवा देशात प्रमुख अतिथी म्हणून हजर राहिल्यावर मिळणारी सन्मानचिन्हे, स्मृतिचिन्हे, मानपत्रे, महागड्या भेटी ठेवण्याकरिता सध्याच्या राष्ट्रपती भवनात पुरेशी जागा नसल्याने सध्याच्या राष्ट्रपती भवनासारखेच हुबेहुब विस्तारित राष्ट्रपती भवन उभारण्यात येत असून हे काम ठाण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्ट व लॅण्डस्केप डिझायनर अरुण कुमार हे करीत आहेत.माजी राष्ट्रपतींना मिळालेली मानचिन्हे व भेटवस्तू ठेवण्याकरिता सध्या राष्ट्रपती भवनात तयार केलेल्या म्युझियमची जागा अपुरी पडत असल्याने सध्या या वस्तू चक्क पोत्यांमध्ये गुंडाळून ठेवल्या आहेत. त्या ठेवण्याकरिता विस्तारित राष्ट्रपती भवन उभारण्याचा निर्णय झाला. सध्याच्या वास्तूशेजारी ३०० एकर जमीन उपलब्ध करून त्यापैकी ३० एकरांवर हे विस्तारित भवन उभे केले जाणार आहे.ठाण्यात राहणारे अरुण कुमार यांनी यापूर्वी अहमदाबाद येथील स्वामिनारायण मंदिर आणि दिल्लीतील अक्षरधाम मंदिराचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमार यांचे काम पाहिले असल्याने विस्तारित राष्ट्रपती भवन उभारण्याकरिता पंतप्रधान कार्यालयाने त्यांनाच निमंत्रित केले. राष्ट्रपती भवनाची वास्तू ही ब्रिटिशकालीन आहे. नवीन भवनाचा प्रारूप आराखडा तयार करताना ती मूळ वास्तूसारखी दिसेल व गरजा पूर्ण होतील, याचा विचार लॅण्डस्केपिंग करताना केला आहे. हॉल, पार्किंग आदी सुविधा त्यामध्ये असतील, असे कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जीआरसीचा केला जाणार वापरमूळ वास्तूत ज्या दगडांचा वापर केला गेला आहे, आता ते दगड मिळणे कठीण आहे. परंतु, नव्या वास्तूला तोच फील यावा म्हणून जीआरसी म्हणजे ग्लास रेनफोर्समेंट कॉँक्रिटीकरणाचा वापर केला आहे. यामध्ये मोल्ड, डाय, कलर ट्रीटमेंट करून नव्या वास्तूतील दगडांनाही तेच स्वरूप दिले जाणार आहे. जुन्या वास्तूप्रमाणेच नव्या वास्तूमध्ये रंगसंगती असणार आहे. तसेच जुन्या भवनात जसे लॅण्डस्केप गार्डन ज्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर नव्या भवनात तयार करण्यात येणार आहे. ही वास्तू उभारण्याचे काम सरकारची नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन करीत आहे. परंतु, या वास्तूची संकल्पना आणि आराखडा हा कुमार यांचा आहे.
ठाणेकराच्या शिरपेचात प्रति राष्ट्रपती भवन
By admin | Published: February 05, 2016 2:49 AM