उल्हासनगर- देशभरात अग्निशमन दलाच्या २५ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. यांपैकी ८ जण हे महाराष्ट्रातील असून यातील ४ राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी आहेत. यात महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन अधिकारी पंकज पवार, स्टेशन अधिकारी संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा समावेश आहे. त्यांना स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इमारत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. तसेच वालधुनी व उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यातून शेकडो नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. याची दखल शासनस्तरावर घेऊन विभागाच्या या चार जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे प्रमुख व शौर्य पुरस्कार विजेते बाळू नेटके यांनी दिली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी एकाच विभागाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाले. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर होताच, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अग्निशमन दलात कंत्राटी जवांनाचा भरणा? महापालिका अग्निशमन विभागात वर्षानुवर्षे भरती न झाल्याने, ७० टक्के पेक्षा जास्त जुने अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी महापालिकेने ठेक्याने व कंत्राटी पद्धतीने जवान घेतले. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे अग्निशमन दलाची कामगिरी चमकदार व डोळ्यात भरण्या जोगी आहे. महापालिका प्रशासनाने विभागाची अशीच कामगिरी राहण्यासाठी कंत्राटी जवांनाना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे.