ठाणे : स्मार्ट ई -गव्हर्नन्स स्पर्धेत ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांचा वापर, ठाणे शहरातील मंदिरे, तसेच उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती या ठाणे महापालिकेच्या प्रकल्पांचा देशातील ४० उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये समावेश झाला असून भारत सरकारच्या अपांरपारिक उर्जा मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कारही ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राशी निगडीत समस्या व इतर विषयांवर १९९७ पासून स्कॉच ग्रुप काम करीत असून त्यांनी नुकतेच स्मार्ट ई गव्हर्नन्स २०१५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांची अशी एकूण ४०० नामांकने नोंदविण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने शहरामध्ये कार्यान्वित केलेल्या ऊर्जा कार्यक्षमता व पर्यावरणपूरक एलईडीचा रस्त्यांवरील दिव्यांसाठी वापर हा प्रकल्प तर प्रदूषण नियंत्रण कक्षाने शहरातील देवालये व उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेचा निकाल आता जाहीर झाला असून भारतातील उत्कृष्ट ४० प्रकल्पांमध्ये या दोन प्रकल्पांची निवड झाली आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेला स्कॉच आॅर्डर आॅफ मेरीट या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार २२ व २३ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येईल. अपारंपरिक उर्जेची यंत्रणा कार्यान्वित करणे आणि तिचा प्रसार करणे यासाठी ठाणे महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन भारत सरकारच्या अपांरपरिक ऊर्जा मंत्रालयाने महापालिका गटामध्ये तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन ठाणे महानगरपालिकेचा सन्मान केला आहे. येत्या २७ आॅगस्ट, २०१५ रोजी हा पुरस्कार केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते बंगलोर येथे एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
ठामपाला अपारंपरिक ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार
By admin | Published: August 27, 2015 12:20 AM