भिवंडी : वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धामणकरनाका येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याधीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अंकुश बचुटे, बुद्धेश जाधव, शशिकांत जाधव, अक्षय भोईर, बालाजी कांबळे, नियाज चायवाला आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, एसीपी नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा धामणकरनाका येथे होता. हे आंदोलन सोडल्यास संपूर्ण शहरातील वाहतूक व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, शांतीनगर पोलिसांनी आघाडीचे लोकसभा अध्यक्ष मेहबूब बादशाह शेख यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना शुक्र वारी पहाटेच ताब्यात घेऊन दुपारनंतर जामिनावर त्यांची सुटका केली. दरम्यान, भिवंडीत अन्य व्यवहार तसेच वाहने सुरळीत सुरू होती. शहरात पोलिसांची गस्त सुरू होती.अंबरनाथ-बदलापूरमध्ये दुपारपर्यंत दुकाने बंदअंबरनाथ/बदलापूर : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. अंबरनाथमध्ये काही दुकानदारांनी दुपारी १२ पर्यंतच बंद पाळला,तर काही दुकानदारांनी सकाळपासूनच दुकाने नियमित सुरू ठेवली. तर रिक्षाचालकांनी दुपारपर्यंत बंद पाळला. हीच परिस्थिती बदलापूरमध्येही होती. बदलापूरमध्ये दुपारी १ पर्यंत अनेक दुकाने बंद होती. तर रिक्षाचालकांनी पश्चिम विभागात आपल्या रिक्षा सुरूच ठेवल्या होत्या. तर पूर्व भागात काही रिक्षाचालकांनी बंद पाळला. मात्र दुपारी १ नंतर बंदचा कोणताच परिणाम दिसला नाही. बदलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. मात्र काही दुकानदारांनी स्वत:हून बंद पाळला. तर काहींनी नियमित व्यवहार सुरु ठेवले. पूर्व भागात अनेक दुकाने सकाळच्या सत्रात बंद होती. मात्र रिक्षाचालकांनी काही अंशी बंद पाळला. तर पश्चिम भागात काही ठिकाणी दुकाने सुरू होती तर काही ठिकाणी बंद होते. ही सर्व परिस्थिती स्टेशन परिसरात होती. मात्र शहराच्या अंतर्गत भागात दुकाने सुरू होती. सर्व व्यवहारही सुरूळीत सुरु होते. अंबरनाथमध्ये स्टेशन रोडवरील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भाजी मंडईतील व्यवहार सुरू होते. अंबरनाथमधील रिक्षाचालकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला.
‘वंचित’चा भिवंडीत रास्ता रोकोचा प्रयत्न, अंबरनाथ-बदलापूरमध्ये दुपारपर्यंत दुकाने बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:30 AM