ठाणे : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने येणार म्हणून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी सायंकाळी उभारलेल्या व्यासपिठासाठी पोलीस आणि महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या व्यासपीठामुळे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी झाली. त्याचा परिणाम या रस्त्याला जोडलेल्या अन्य रस्त्यावरील वाहतुकीला बसल्याने ठाणेकरांची ऐन घरी परतायच्या वेळेला पुरती कोंडी झाल्याचे दिसले.
ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा सुरू केला असून ही यात्रा सोमवारी ठाणे शहरात येणार होती. यासाठी शिवसेनेने महापालिका मुख्यालयासमोर भले मोठे व्यासपीठ उभारले. सायंकाळी अचानकपणे ते काम सुरू झाल्यामुळे पोलिसांनाही थांगपत्ता नव्हता. व्यासपीठ उभारणीसाठी महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.
ठाकरे आलेच नाहीतआदित्य हे या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यात सायंकाळी सहा वाजता येणार होते. त्यासाठी ठाण्यासह आजूबाजूच्या भागातून महिला कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाच वाजल्यापासून हजेरी लावण्यास सुरुवात केली. सायंकाळी सात वाजले तरी ते आले नाहीत, त्यानंतर कुजबुज सुरू झाली. नंतर स्टेजवरील वीजप्रवाह बंद करण्यात आला. अखेर नाशिक येथे अडकल्यामुळे ते येणार नाहीत, असे सांगण्यात आल्यामुळे उपस्थित शिवसैनिकांनी या भागातून काढता पाय घेतला.