कल्याण : ठाकुर्लीत राहणारे रेल्वे कर्मचारी सुरेश साळवे यांचा उंदराने डोळा कुरतडला होता. मात्र वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू लिव्हर खराब झाल्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
साळवे हे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत रेल्वे कॉलनीत राहतात. सुरेश हे लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेस्थानकात खलाशी म्हणून कार्यरत होते. बुधवारी झोपेत असताना त्यांचा डोळा उंदराने कुरतडला. त्यांची नखेही कुरतडली होती. त्यांचा डोळा रक्तबंबाळ झाला होता. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण अहवालातून समोर आले. त्यांचा मृत्यू लिव्हर डॅमेजमुळे झाल्याचे कारण अहवालात नमूद करण्यात आले आहे. अतिमद्यसेवनामुळे त्यांचे लिव्हर खराब झाले होते. त्यांच्यावर यापूर्वीही उपचार सुरू होते.
दरम्यान, सुरेश यांचे भाऊ अशोक साळवे यांनी सांगितले की, उंदराने डोळा कुरतडल्याने सुरेश यांची प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला असला तरी, अहवालात त्यांच्या मृत्यूचे वेगळेच कारण समोर आले आहे. त्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. यासंदर्भात रेल्वे रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेला वैद्यकीय अहवाल योग्य असून, याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सुरेश साळवे ज्या परिसरात राहत होते, त्या परिसरातील कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगारे यांनी सांगितले की, या परिसरात अस्वच्छता असून, उंदरांचाही सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे सुरेश हे झोपेत असताना उंदराने त्यांचा डोळा कुरतडल्याची घटना घडली आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
------------------