कल्याण : ठाकुर्ली परिसरातील विजेता इमारतीनजीक असलेल्या शिधावाटप दुकानातून शिधापत्रिका धारकाना रॉकेल, गव्हू, तूरडाळ दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने स्थानिक भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी थेट दुकानात धडक दिली. त्याठिकाणी शिधावाटप अधिका:याना पाचारण केले. नागरीकांच्या व्यथा मांडल्या. अधिकाऱ्यांनी गैर प्रकार होत असल्याचे मान्य केले. नगरसेविका चौधरी यांनी संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
ठाकुर्ली परिसरात यापूर्वी तीन शिधावाटप दुकाने होते. या तीन सरकारी शिधावाटप दुकानापैकी दोन दुकाने बंद पडली. आत्ता एकच दुकान सुरु आहे. बंद पडलेल्या दोन दुकानाचे शिधापत्रिकाधारक सध्या सुरु असलेल्या दुकानाशी जोडलेले आहेत. त्यांच्या शिधापत्रिकेवर गॅस कनेक्शनची नोंद नाही. तरी देखील त्यांना रॉकेल दिले जात नाही. ज्या शिधापत्रिकाधारकाना रॉकेल दिले जाते. त्याचे प्रमाण कमी आहे. दुकानात तूरडाळ आली आहे. तिचे वाटप केले जात नाही. दुकानात तूरडाळीच्या गोण्या पडून आहेत. गव्हाचा साठा आहे. तो देखील दिला जात नाही. गेल्या तीन महिन्यापासून हा प्रकार केला जात आहे. डिजिटलायङोशनचे कारण पुढे करुन शिधापत्रिकाधारकांचे अंगठे घेऊन पावती फाडली जाते. पावत्या जमा केल्या जातात. त्यांना शिधा वाटप केला जात नाही. या पावत्यांचा खच दुकानात एका बरणीत भरुन ठेवलेला आढळून आला.
हा सगळा प्रकार संतप्त शिधापत्रिका धारकांच्या मदतीने नगरसेविका चौधरी व त्यांचे पती व माजी नगरसेवक श्रीधर चौधरी यांनी उघडकीस आणला आहे. घटनास्थळी हा प्रकार उघड झाल्यावर दुकानदाराची भांबेरी उडाली. दुकानात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केला जात असल्याचे प्रथम दर्शनी उघड झाले आहे. नगरसेविका चौधरी यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याना दुकानात पाचारण केले. अधिकाऱ्यांनी घडल्या प्रकार मान्य केला. मात्र संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे. दिवाळी जवळ आली आहे. ठाकूर्ली परिसरातील नागरीकाना शिधा न मिळाल्याने त्यांच्या दिवाळीचा फराळ कसा करायचा असा प्रश्न त्याना सतावित आहे. त्यांची दिवाळी अंधारात साजरी होणार असली तरी दुकानदारांची दिवाळी सुरु असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे. सरकारकडून सर्व दुकानदाराना योग्य प्रमाणात शिधा पुरविला जातो. त्याचे वापट योग्य प्रकारे केले जात नाही. सणावारात दुकानदार शिधावाटपात काळाबाजार करुन शिधापत्रिकाधारकांच्या तोंडाला पाने पुसतात. या प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.