ठाणे : प्रेक्षक नाटक पाहतात, ते कसे पाहतात, त्यांना नाटक समजतं की नाही, समजल्यास ते कसे समजते ही एक प्रोसेस आहे. ते शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केले.समकालीन प्रकाशनतर्फे मतकरी यांच्या गोंदण, शांततेचा आवाज, सोनेरी सावल्या या तीन पुस्तकांचा लोकार्पण सोहळा रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ग्रंथसखाचे श्याम जोशी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते.‘आपल्याकडे गूढकथेला वाव दिला नाही. त्याचा नीट अभ्यास केला नाही. या कथा कमी प्रमाणात लिहिल्या गेल्या. समीक्षकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले, अशी नाराजीही मतकरी यांनी व्यक्त केली.मतकरी म्हणाले, नाटक, एकांकिका लिहिल्यावर १० वर्षांनी गूढकथा लिहायला लागलो. माणसांच्या आयुष्यात अनेक गूढ असतात. मानवी आयुष्यातील गुढाविषयी बोलणा-या कथा म्हणून त्यांना गूढकथा म्हटले जाते, असे सांगत ते म्हणाले, माझे पहिले वाचन हे नाटकांचे होते. मला त्या वाचनाचा कंटाळा आला नाही.मतकरी यांनी ठाण्यातील वंचितांचा रंगमंच सुरू करण्यामागचा उद्देश विशद केला. तुम्हाला काय म्हणून घ्यायला आवडेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मला स्वत:ला लेखक म्हणून घ्यायला आवडेल. मी कोणत्या एका वर्गातला, धर्माचा, गटातला लेखक नाही. मी लेखक, नाटककार झालो नसतो तर मी चित्रकार किंवा एक्झिक्युटिव्ह झालो असतो, असेही रत्नाकर मतकरी म्हणाले.
नाटक समजण्याची प्रक्रिया शिकली पाहिजे- रत्नाकर मतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:05 AM