ठाणे : जेष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना त्यांच्यात शब्दात आदरांजली म्हणून त्यांनी नाट्यरूपांतर केलेले व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे अभिवाचन गंधारचे बालकलाकार करणार आहेत. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर मतकरी हे कायम मुलांच्या मनात रहावे हा गंधारचा हेतू आहे. सलग 10 दिवस हे अभिवाचन सुरू राहणार आहे.
पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या, मतकरी यांनी नाट्यात रूपांतरित केलेल्या आणि गंधारचे संस्थापक अध्यक्ष मंदार टिल्लू यांच्या संकल्पनेतून बालकलाकारांना घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाचे 25 प्रयोग आतापर्यंत झाले आणि प्रेक्षकांच्या मनात या बालकलाकारांनी घर केले. 8 ते 15 वयोगटातील 25 बालकलाकार या नाटकात असून प्रत्येक बालकलाकाराने या नाटकात उत्तमरीत्या आपली भूमिका साकारली आहे. नुकतेच मतकरी सरांचे निधन झाले त्यामुळे त्यांना त्यांच्याच शब्दांनी आदरांजली वाहिली तर ती संयुक्तिक ठरेल म्हणून ऑनलाइन व्यक्ती आणि वल्ली नाटकाचे अभिवाचन करायचे ठरवले असे टिल्लू यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे एखादा प्रयोग करणे शक्य नाही म्हणून पु.ल. देशपांडे यांच्या दहा वल्ली अभिवाचनातून लोकांसमोर आणणार आहे. 22 मे ते 31 मे या दरम्यान होणार आहे. गंधारच्या फेसबुक पेजवर हे अभिवाचन पाहता येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या अभिवाचनास सुरुवात होणार आहे. परंतु संध्याकाळी जो बालकलाकार अभिवाचन करेल त्याचा सकाळी 11 वाजता ऑनलाइन सराव करून घेतला जाणार आहे. प्रत्येक मुलगा आपापल्या घरात बसून हे अभिवाचन करणार आहे. या बालकलाकारांना मतकरी सर भेटले आहेत. त्यामुळे त्यांना देखील ही संकल्पना आवडली आहे. आताच्या पिढीला मतकरी सर माहिती व्हावे यासाठीच हा प्रयत्न असल्याचे टिल्लू म्हणाले.