ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंदरांना मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे मरणारे मृत उंदीर खाल्ल्याने ते कावळ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र आवश्यक असले, तरी तेमोडण्याचा प्रयत्न माणसांकडून होत आल्याचे दिसत आहे.निसर्गाने पशुपक्ष्यांची निर्मिती करताना प्रत्येकाला वेगवेगळेपणा दिला असला, तरी भारतीय संस्कृतीत अनेक सजीवांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महत्त्व प्राप्त आहे. यात उंदीर (मूषक) आणि कावळा (काक) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षात कावळ्यांना पंचपक्वान्ने खायला घातली जातात. कावळा हा निसर्गप्रेमी पक्षी आहे. दिसायला काळा आणि त्याचा आवाजही कर्कश आहे. उपजीविकेसाठी तो लहानलहान उंदीर, मेलेले इतर प्राणी, घरातून फेकले गेलेले पदार्थ खातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील रस्त्यांवर कावळे मृतावस्थेत पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत कोपरीतील परिसरात पाच ते सहा कावळे विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.उंदरांचा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुतेक वेळा मानवी वस्त्यांमध्ये त्यांना मारण्यासाठी अनेक विषारी औषधे खाण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून ते उंदरांना खायला देतात. हे पदार्थ खाऊन मेलेले उंदीर कचºयात फेकल्यावर ते कावळे खातात. त्यामुळेच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दाट आहे. अशा प्रकारेही यापूर्वी कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचे पक्षी अभ्यासक सिद्धेश करगुंटकर यांनी सांगितले.दक्ष असलेला पक्षी-कावळ्यांचे नैसर्गिक आयुष्य १२ ते १३ वर्षांचे असते. शिवाय, त्याची नजर अत्यंत दक्ष असल्याने त्याच्यावर दगड वगैरे फेकून त्याला जखमी करणेही कठीण असते.असे असताना दक्ष समजले जाणारे हे कावळे मात्र रस्त्यांवर मृतावस्थेत दिसू लागले आहेत.
कावळ्यांच्या जीवावर उठले आहेत उंदीर, पक्षिप्रेमी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:50 AM