ठाणे - खंडणी न देणा-या बिल्डरच्या कार्यालयावरील गोळीबाराचा कट ठाणो खंडणी पथकाने उधळून लावून कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोन हस्तकांच्या शुक्रवारी रात्री घोडबंदर रोडवर मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. यातील एकाला 2004 मध्ये सुरत पोलिसांनी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. नितीन गोपाळ राय आणि दिनेश नारायण राय अशी त्यांची नावे आहेत.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील नामांकित बिल्डरकडे रवी पुजारी याने 10 कोटींच्या खंडणीसाठी वारंवार फोन करून धमकी दिली होती. याप्रकरणी त्या बिल्डरने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिचा समांतर तपास खंडणी पथकामार्फत सुरू होता. दरम्यान,पुजारीच्या टोळीतील दोन हस्तक बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणीप्रमुख प्रदीप शर्मा यांना मिळाली होती.
त्यानुसार,पातलीपाडा येथून हिरानंदानी इस्टेटकडे जाणा-या रस्त्यावरील गार्डनजवळ पोलीस निरीक्षक राजकुमार थमिरे,पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन,आर.जे.देवरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत,पोलीस हवालदार सुरेश मोरे, अंकुश भोसले,मोहन चौधरी,सुभाष तावडे,पोलीस नाईक चंद्रकांत ठाकरे,प्रशांत भुर्के,नितीन ओवळेकर,संदीप भांगरे,हेमंत महाले,बाळू मुकणो या पथकाने दबाव धरून रवी पुजारीचे हस्तक असल्याची खात्री पडल्यावर झडप घालून नितीन गोपाळ राय (42) रा.मालाड मुंबई आणिदिनेश नारायण राय (51) रा.घाटकोपर मुंबई या दोघांच्या मुसक्या आवळल्या.तसेच चौकशीत त्यांनी रवी पुजारी टोळीकरिता काम करीत असून पुजारीच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यास आल्याची क बुली दिली.
दिनेश हा पूर्वी फजलूर रहेमान गॅंगसाठी काम करीत होता.त्याने दिलेल्या माहितीवरून रहेमान याने परदेशातून सुरत येथील पराग साडीचे मालक शिवनारायण आगरवाल यांना फोन करून खंडणीसाठी धमकावले होते.तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेल्या पराग साडीच्या जाहिरातीचे पूर्ण पैसे देण्याबाबत धमकावले होते.पराग साडीच्या मालकाची माहिती पुरवल्याबाबत दिनेश राय याला 2004 मध्ये सुरत पोलिसांनी अटक केली होती.तर नितीन याच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.तसेच त्याच्या डोक्यावर कर्ज झाल्याने त्याला पैशांची गरज असल्याने त्याने हा मार्ग स्वीकारल्याचे तो सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोघांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शनिवारी ठाणो न्यायालयाने त्यांना 13 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. तसेच त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.