ठाणे : एका बिल्डरवर गोळीबार करण्यासाठी ठाण्यात आलेल्या दोन खंडणीखोरांच्या मोबाइल फोनमध्ये त्यांचे गँगस्टर रवी पुजारीसोबतचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी तसा उल्लेख केला आहे.खंडणीसाठी घोडबंदर रोडवरील एका बिल्डरवर गोळीबार करण्यासाठी दोन शूटर्सना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने आॅक्टोबर २०१७ मध्ये अटक केली होती. या बिल्डरला रवी पुजारीने १० कोटींची खंडणी मागितली होती. त्याने धमक्यांना भीक घातली नाही, म्हणून रवी पुजारीने मालाड येथील नितीन राय आणि घाटकोपर येथील दिनेश राय यांना बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यास पाठवले होते. ठाणे खंडणीविरोधी पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली होती. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांनी या प्रकरणाचा तपास करून विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.आरोपींना अटक केल्यावर पोलिसांनी मोबाइल हस्तगत केले. या मोबाइल फोनमध्ये पोलिसांना काही कॉल रेकॉर्डिंग आढळले होते. त्यापैकी काही रेकॉर्डिंग रवी पुजारीचे होते. बिल्डरच्या कार्यालयावर जाऊन गोळीबार करण्याबाबत स्पष्ट सूचना त्याने दोन्ही आरोपींना दिल्याचे या रेकॉर्डिंगवरून स्पष्ट होते. यावरून या गुन्ह्यातील रवी पुजारीचा सहभाग पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपपत्रामध्ये तक्रारदार आणि साक्षीदारांचे जबाब आणि संबंधित पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खंडणीखोरांच्या मोबाइलमध्ये रवी पुजारीचे रेकॉर्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:40 AM