डोंबिवली: शहरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होत असतील तर त्या प्रश्नी माहापालिका आयुक्त, संबधित अधिकारी यांना जबाबदार धरावे, त्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी कडक शब्दांत पत्र लिहून अधिकाऱ्यांना सूचित करावे अशी विनंती माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डेप्यु.आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांना केली. जागतिक रस्ते अपघात स्मृतिदिनानिमित्त अपघातात मयत झालेल्याना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पश्चिमेकडील रेल्वे स्थानाकासमोर असलेल्या घनश्याम गुप्ते रस्त्यावरील खड्डे पाहून त्यांनी माहापालिका अभियंता अधिकारी महेश गुप्ते यांना रस्ते दुरुस्त होणार आहेत की नाही? असे विचारले, की त्याची तजवीज आम्हाला करावी लागेल असे फोनवर विचारले, त्यावर गुप्ते म्हणाले की त्या ठिकाणच्या कंत्राटदाराने काम अडवून ठेवले आहे, त्यामुळे खड्डे जैसे थे आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण दोन दिवसात त्या।कामाला सुरुवात करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे शहरातील खड्डयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे स्पष्ट झाले. केडीएमसी अधिकारी कामांकडे कानाडोळा करतात, अनेकदा स्थानिक नगरसेवक पाठपुरावा करतात पण अधिकारी पाठ फिरवतात असे सांगून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे याना तातडीने कठोर शब्दात पत्र लिहावे असे सांगितले. ससाणे यांनीही रस्त्याची समस्या खरी असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे म्हंटले. तसेच वाहन चालकांनी जपून वाहन चालवावे असे आवाहन केले. चव्हाण यांनी वाहनचालकांना विमा जरूर काढावा त्यासाठी केंद्र सरकारची अपघात विमा योजना असून दिवसाला 12 ते 15 रुपये स्वतःसाठी काढावे असे आवाहन केले. त्या दरम्यान ससाणे यांनी उपस्थित रिक्षा चालक, कार चालक, दुचाकीस्वार आदींना शून्य अपघाताची शपथ दिली. तसेच आदरांजली वाहून या कार्यक्रमाचे आयोजन शेखर जोशी यांचे कौतुक केले, जोशींनी वाहनचालकांनी आवर्जून रिक्षा बंद ठेवून, वाहने बंद ठेवून तासभर अपघात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी काढला याबाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले.
वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे अशी मागणी वाहन चालकांनी यावेळी।केली. तसेच आरटीओ अधिकाऱ्यांनी आवर्जून याठिकाणी यावे कारवाई करावी असेही म्हंटले. अभावानेच कधीतरी आरटीओ अधिकारी कारवाईसाठी येतात त्यामुळे त्याचा धाक येथील वाहनचालकांना नसतो असेही सांगण्यात आले. त्यावर आरटीओ अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईत सातत्य येईल, पण त्यामुळे वाहन बंद ठेवणे, नागरिकांना वेठीस धरणे असे करू नका असेही कडक शब्दात रिक्षा चालकांना उद्देशून खडसावले, असे सांगताच सर्वत्र हशा पिकला.