- हुसेन मेमन
जव्हार : सार्वजनिक बांधकाम उप विभाग जव्हारचे उपविभागीय अभियंता दिनकर होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जव्हार तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना भाजपनंतर राष्ट्रवादी असा पक्षीय प्रवेश केलेले रविंद्र शिवदे यांच्याविरोधात खंडणीच्या गुन्हात अटक झाली आहे. यामुळे जव्हार तालुक्यात खळबळ उडाली असून खंडणीखोर माहीती कार्यकर्ते आणि बोगस पत्रकारांचेही धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार शिवदे यांनी आजवर ८४ माहितीचे अर्ज या कार्यालयात दाखल केले असून सार्वजनिक बांधकाम विभागातून निघणारी कामे देण्याची मागणी केली आहे. त्या शिवाय त्यांचा पुतण्या राकेश शिवदे यांच्या गुरुदेव कंट्रक्शन नावाच्या कंपनीला कामे द्या तसेच रखडलेल्या बिलाची रक्कम तात्काळ द्या, मलाही पैसे द्या अशी मागणी करून अन्यथा मी तुमची नोकरी घालवतो, स्थानिक गुंडांकरवी मारहाण करतो, अशी धमकी देत कार्यालयात गोंधळ घातला. फिर्यादीनुसार जव्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी शिवदे हे तत्कालीन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. त्यांनी बंडखोरी करत काही दिवस भाजप आता राष्ट्रवादी असा पक्षीय प्रवेश केलेला असून सेनेतील काही मोठ्या नेत्यांवर सोशलमिडीयावर टीका करणे, अर्बन बँके संदर्भात सतत दिशाभूल करणारे मेसेज टाकणे तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल करणे यासाठी ते कुप्रसिद्ध होते. तर मागील काही दिवसांपासून बांधकाम विभाग जव्हार मधील भ्रष्टाचारही समोर आणला होता. मात्र आता सध्या ते खंडणीच्या आरोपात अटक आहेत.
या घटनेमुळे जव्हार शहरात खळबळ उडाली असून या घटनेचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबत आरोपीला जव्हार कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक डी. पी. भोये करीत आहेत.