ठाणे : निवडणूक विभागाने एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार कच्चा प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचेही स्थानिक स्वराज्य संस्थेवर सोपविले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत समिती गठीत केली आहे. ही समिती एका महिन्यात प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करणार आहे.
निवडणूक आयोगाने २७ ऑगस्टपासून प्रभाग रचना करण्याच्या कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका नगररचना संचालक, दोन्ही अतिरिक्त आयुक्त, संगणक तज्ज्ञ,निवडणुकीच्या कामाचा अनुभव असलेले उपायुक्त, सर्वेक्षण करणारे अधिकारी यांची बैठक पार पडली. त्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार एक सदस्य प्रभाग रचना करावी, नाले मोठे रस्ते उड्डाणपूल, गल्ली यांचा समावेश करावा, शक्यतो इमारती आणि वस्त्यांचे विभाजन होणार नाही, याची काळजी घ्यावी, मोकळ्या जागा मैदान यांचा कोणत्या न कोणत्या प्रभागात समावेश करावा, अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांची वस्ती असलेल्या ठिकाणाचे विभाजन करू नये, प्रभाग रचना करताना प्रगणक गट फोडण्यात येऊ नये, प्रभाग रचना करताना प्रभाग क्रमांक देण्यात येणार आहे तसेच प्रभागाची नावेदेखील द्यावीत, प्रभागाची सीमा निश्चित करताना उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण असा उल्लेख करावा, प्रभाग रचना करताना उत्तरेकडून आणि दक्षिणेकडे शेवट करावा तसेच प्रभाग क्रमांक देखील द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी गुगल मॅचा उपयोग करावा. त्याचे नकाशे टाकावेत, प्रभाग रचनेची माहिती कोणालाही देऊ नये, असेदेखील सांगण्यात आले आहे.