कल्याण : कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस न मिळाल्याने केडीएमसीने चार दिवसांपासून लसीकरण मोहीम स्थगित केली होती. मात्र, बुधवारी मनपाला चार हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी या मोहिमेला पुन्हा सुरुवात होत आहे.
कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे शाळेतील आणि डोंबिवलीतील सावळाराम क्रीडासंकुलातील लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते सायं. ५ दरम्यान हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तर, अन्य १५ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस सकाळी १० पासून लसीचा साठा उपलब्ध असेपर्यंत दिला जाणार आहे.
दरम्यान, कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असतील, अशा नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कालावधी पूर्ण झाला नसेल, तर लसीचा डोस दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. सरकारच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.
-----------------