डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावरील मानपाडा चौकाजवळ एमआयडीसी परिसरातील पॅरोक्सी केमिकल कंपनीतील एका रिअॅक्टरमध्ये सोमवारी दुपारी अचानक स्फोट झाला. त्यात कंपनीतील एक सुपरवायझर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.
एमआयडीसी फेज २ मधील प्लॉट नंबर १६१ मध्ये राजेंद्र खांडेकर यांच्या मालकीची पॅरोक्सी केमिकल कंपनी आहे. या कंपनीतील पाचपैकी एका रिअॅक्टरमध्ये दुपारी १.२५ च्या सुमारास प्रेशर वाढल्याने अचानक स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रिअॅक्टरला लागलेली आग सुमारे चार ते पाच मीटर उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारी असलेल्या कंपनीत जाऊन या आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना घडली तेव्हा पॅरोक्सी कंपनीत चार कामगार होते. तर, सुपरवायझर सचिन देशमुख (४०) यांच्या अंगावर रिअॅकटरमधील तेल उडाल्याने ते जखमी झाले. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की, इतर कंपनीतील कामगारांनीही कंपनीबाहेर धाव घेतली होती.