ठाणे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्था, मुंबई व मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थांच्या वतीने जगविख्यात साहित्यकार अमृता प्रीतम, सआदत हसन मंटो व प्रतिभा राय यांच्या अजरामर कथांवर अभिवाचनाचा कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक डॉ, वसुधा सहस्त्रबुध्दे या करणार आहेत, याचबरोबर वाचकांसाठी "आवडत्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची "वाचनध्यास" ही स्पर्धाही" आयोजित करण्यात आली आहे.
15 ऑक्टोंबर 2018 हा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, "वाचन प्रेरणा दिन" म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई व मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचकांसाठी आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची "वाचनध्यास" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने वर्षभरात सर्वाधिक पुस्तके वाचलेल्या वाचकांचा पुस्तक भेट देऊन सत्कारही केला जाईल. ज्ञानपीठ व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित 50 हून अधिक पुस्तके प्रकाशित, देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले साहित्यकृती निर्माण केलेल्या पद्मविभूषण अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचे अभिवाचन करण्यात येणार आहे. 22 कथासंग्रह, एक कादंबरी तसेच इतर विविध साहित्य निर्माण केलेल्या आणि ज्यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी झाली, त्या सआदत हसन मंटो यांच्याही साहित्याचे अभिवाचन करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या 20 कादंबरी, 24 लघुकथा संग्रह, 10 वृत्तांत व दोन कवितासंग्रह यांचे देशी विदेशी भाषेत भाषांतर झालेले प्रतिभा राय यांच्या साहित्याचेही यावेळी अभिवाचन केले जाणार आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे या अभिवाचन करणार आहेत.
सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 10 ते 1 यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालय (नौपाडा शाखा) ग. ल. जोशी सभागृह, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प). शारदा मंदिर येथे आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची स्पर्धा होईल, तर सायंकाळी 6 ते 9 या वेळी सरस्वती मंदिर (मुख्य शाखा) रेगे सभागृह, पहिला मजला नेताजी सुभाष पथ, ठाणे (प) येथे अमृता प्रीतम, सआदत हसन मंटो, प्रतिभा राय यांच्या अजरामर साहित्यकलाकृतींवर अभिवाचन होईल, तरी वाचकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने करण्यात आले आहे.