डोंबिवली: येथील कल्याण शीळ मार्गालगत असलेले पुरातन खिडकाळेश्वर शिवमंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज झाले असून, या मंदिरासमोरच असलेले मोठे तळे सुशोभित करण्यात आले आहे.खिडकाळी गावच्या ग्रामस्थांकडे मंदिराचा ताबा आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे मंदिर कल्याण शीळ मार्गावर असल्याने बस व रिक्षाने मंदिराकडे जाता येते. डोंबिवली व कल्याणहून रिक्षा व बसने मंदिर गाठता येते. ठाणे, पनवेल परिसरातील शिवभक्तही याठिकाणी दर्शनासाठी येतात. अनेक शिवभक्त कावड घेऊन याठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यातील काही शनिवारी सायंकाळीच कावड घेऊन मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. रात्रभर त्यांच्याकडून महादेवाचा जयघोष व भजन कीर्तन होणार आहे. श्री खिडकाळेश्र्वर येथे संजीवन समाधीस्त झालेल्या स्वामी शिवानंद महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या व शंकराचार्यांसह संत महंतांच्या पदस्पर्शाने हे मंदिर पवित्र झाले आहे. महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस मंदिर भक्तांनी फु लून जाणार आहे. कल्याण तालुक्यातील हजारो शिवभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. पहिल्या दिवशी म्हणजेच ७ मार्चला मुख्यव्यासपीठावर सकाळी ९ वाजेल्यापासून अखंड रामनाम भजन पार पाडणार आहे. हा कार्यक्रम ८ मार्चपर्यंत सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नेत्र परिक्षण, चष्मा वाटप शिबिर पार पाडणार आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आरोग्य शिबीर पार पाडणार असून, वासन आय केअरतर्फे डोळ््यांचे आजार तपासणी करण्यात येणार आहे. ८ मार्चला सकाळी ९ वाजेल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. हवन विधी, सत्यनारायण महापूजा, जय हनुमान प्रासदिक भजन मंडळ, मुळगाव सोनाळा यांचे भजन, सावळराम महाराज हरीपाठ मंडळांचा हरिपाठ, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज (घाटाव) रायगड भूषण यांचे कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिरांभोवती मांडव टाकण्यात आला आहे. शासनाच्या अनुदानातून मंदिराच्या सभोवती टाईल्स लावण्यात आल्या आहेत. ८ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी लागणारे धान्य, तेल आदीसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या उत्स्फुर्त मिळतात. महाप्रसादाचा अंदाजे ३५ हजार भाविक लाभ घेतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)
खिडकाळेश्वर झाले सज्ज
By admin | Published: March 07, 2016 2:16 AM