लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : राज्य सरकारच्या सूचनेवरून रविवारपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांकरिता रेल्वे प्रवासाची सुविधा दिली गेली असली तरी रविवारचा स्वातंत्र्यदिन व सोमवारची पतेती यामुळे या दोन्ही दिवशी रेल्वे गाड्यांत गर्दी नव्हती. आज, मंगळवारी उपनगरी गाड्यांमध्ये खऱ्या अर्थाने गर्दी असेल. सोमवारी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर पास काढण्याकरिता प्रवाशांची गर्दी होती.
रेल्वे स्थानकात पास काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले; पण निर्णय घ्यायला उशीर केल्याची नाराजीही व्यक्त केली. स्वातंत्र्यदिन रविवारी आल्याने काल लोकलला गर्दी नव्हती. पतेतीची शासकीय कार्यालये, बँका, आदींना सुट्टी असल्याने सकाळच्या वेळी गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. तुरळक प्रवासी मुंबईच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले.
कल्याण जंक्शन आणि डोंबिवली शहरात मध्यमवर्गीय, सुशिक्षित नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. येथील चाकरमान्यांना नोकरी टिकावी म्हणून सुमारे दीड वर्षापासून खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय. सामान्य नागरिकांची झालेली आर्थिक कोंडी आणि लॉकडाऊन अक्षरशः हतबल झालेला रेल्वे प्रवासी कधी एकदा प्रवासाची मुभा मिळते याची वाट पाहत होता. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याचा निर्णय अखेर झाला. आज, मंगळवारपासून रेल्वे गाड्यांना किती गर्दी होते ते कळेल. सध्या डेल्टा प्लस हा व्हेरियंट वाढत असल्याची चर्चा आहे. लोकलला गर्दी झाल्याने डेल्टाचे रुग्ण झपाट्याने वाढल्यास पुन्हा रेल्वे प्रवासावर गदा येण्याची भीती प्रवाशांच्या मनात आहे.
केडीएमसीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही शहरातील एक लाख ५२ हजार नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लसीकरण वेगाने व्हायला हवे. लोकलमध्येही फेरीवाले व गर्दुल्यांचा वावर दिसून येतो. मग सामान्य नागरिकांवरच सर्व बंधने का, असा सवाल प्रवासी करीत आहेत.
..........
वाचली