कल्याण : डोंबिवलीतील मिलापनगर परिसरात नाचण पक्षी आढळून आला आहे. या पक्षाने या परिसरातील झाडावर तयार केलेल्या घरट्यात पिलाला जन्मही दिला आहे.
नाचण हा पक्षी जंगलात आढळून येतो. त्याला ‘नाचरा’ असेही संबोधले जाते. त्याला इंग्रजीत ‘व्हाइट थ्रोटेड फिनटेल फ्लायकॅचर’ असे नाव आहे. मिलापनगरातील स्पेलंडर विला सोसायटीच्या आवारात या पक्ष्यांचे वास्तव्य आढळले आहे. हा पक्षी अवघ्या पाच ते सहा फुटांच्या झाडांच्या फांदीवर त्याचे घरटे तयार करतो. काळसर करड्या रंगाच्या पक्षाच्या गळ्य़ाभोवती सफेद रंग आणि पसरट शेपटी असल्याने तो पटकन नजरेत भरतो. या पक्ष्याचे वास्तव्य म्हणजे पर्यावरणासाठी एक चांगला संकेत मानला जात आहे.
मिलापनगर परिसर हा औद्योगिक वसाहतीलगत आहे. माजी आमदार अशोक मोडक यांच्या कारकिर्दीत अप्पा बाहेकर यांनी या भागात जवळपास पाच हजार झाडे लावली होती. त्यामुळे या परिसरात वनराई आहे. प्रदूषणाची समस्या या परिसरात ३० वर्षांपासून भेडसावत आहे. मात्र या वनराईने तेथे वास्तव्य करणाऱ्यांना काही दिलासा दिला आहे. त्याचाच परिणाम म्हणून काही पक्षी चैत्रात येत असावेत, असा अंदाज या ठिकाणचे जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केला आहे.
---------------