धीरज परब मीरा रोड : तीन दिवस लसीकरण बंद असल्याने गुरुवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी सहापासून दुपारच्या उन्हातान्हात तासनतास लसीकरणासाठी रांगेत असलेल्या सर्वसामान्यांचे हाल होत असताना दुसरीकडे एका भाजप नगरसेवकाने गोतावळ्यासह पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरच्या दालनात थेट लसीकरण करून घेतल्याने संताप व्यक्त केला.मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करात आहेत. परंतु, केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी, तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात आहे. स्वतःच्या मर्जीतील लोकांच्या लसीकरणासाठी उपद्व्याप सुरू असल्याने नागरिक संतापले आहेत. शिवाय केंद्रावरील कर्मचारी आणि पोलिसही त्रासले आहेत. एकीकडे सामान्यांचे हाल चालले असताना दुसरीकडे आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागाचे डॉ. संदीप प्रधान यांच्या दालनात भाजप नगरसेवक रोहिदास पाटील हे पत्नी व अन्य निकटवर्तीय, तसेच भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष श्रीपत मोरे, आदींसह लसीकरण करुन घेत होते. त्याचवेळी बाहेर तपासणीसाठी रुग्ण रांगेत होते.डॉ. प्रधान यांच्या दालनाबाहेर रांगेत असलेल्या नागरिकांकडे विचारणा केली असता त्यांनी लसीकरण नव्हे, तर तपासणीसाठी रांग असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. प्रधान यांच्या दालनात प्रस्तुत प्रतिनिधी गेला असता, तिथे नगरसेवक पाटील यांच्या पत्नी लस घेत होत्या, तर नगरसेवक पाटील हे तिथेच बसले होते. डॉ. प्रधान यांच्यासह लसीकरण प्रमुख डॉ. अंजली पाटीलही उपस्थित होत्या. त्यानंतर नगरसेवकाच्या आणखी एका परिचितास लस दिली. त्यानंतर मोरे हे लस घेण्यासाठी आत आले. डॉ. पाटील यांच्याकडे विचारणा केल्यावर नगरसेवक तेथून निघून गेले. डॉ. पाटील यांनी डॉ. प्रधान यांना येथे लसीकरण कसे सुरू केले, असा जाबही विचारला.
मीरा रोड येथील लसीकरणाचे वास्तव; पुढारी मंडळीच करताहेत दलाली, नागरिक नगरसेवक डॉक्टरच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 9:53 AM