कारण समजल्याशिवाय विसर्जन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:43 AM2018-09-21T02:43:38+5:302018-09-21T02:43:50+5:30
दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
- मुरलीधर भवार
डोंबिवली : शहरातील प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, गणेशमूर्ती काळी पडल्याने कार्यकर्ते व भक्त चक्रावून गेले आहेत. प्रसारमाध्यमांत वृत्त झळकताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली. प्रदूषण आणि मूर्ती काळी पडण्याचा काहीच संबंध नाही. मूर्तिकाराने मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो. त्यामुळे मूर्ती काळी पडली असावी, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेचे अधिकारी येथे फिरकलेले नाहीत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गले म्हणाले, दावडीच्या राजाची मोठी एक आणि दोन लहान मूर्ती काळ्या पडल्या आहेत. परंतु, रासायनिक कारखान्यांचा परिसर हा मंडळाच्या ठिकाणापासून एक ते दीड किलोमीटर दूर आहे. दावडीच्या राजाच्या
जवळच एका मैदानात भगवान मित्र मंडळानेही मूर्तीची स्थापना केली
आहे. परंतु, त्यांच्या मूर्तीला काहीही झालेले नाही. दावडीचा राजा घडवणाºया मूर्तिकाराने त्याच परिसरात सात मूर्ती दिल्या असून त्यांच्यावरही परिणाम झालेला नाही. त्यामुळे प्रदूषणामुळे मूर्ती काळी पडली, याला आधार नाही. मूर्तिकाराने वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो.
पर्यावरण दक्षता मंचाच्या प्रकल्प समन्वयिका रूपाली शाईवाले म्हणाल्या की, मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगांची प्रयोगशाळेत तपासणी केलेली नाही. त्यामुळे मूर्ती प्रदूषणामुळेच काळी पडली, असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. मूर्तिकाराने प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती घडवली आहे. त्यावर हवेतील प्रदूषणाचा परिणाम होत नाही. मात्र, रंगात लेड अथवा मर्क्युरी हे घटक असल्यास त्याचा परिणाम होऊन मूर्तीचा रंग बदलण्याची शक्यता आहे. दावडीतील अन्य मूर्ती काळवंडलेल्या नाहीत. त्या मूर्तीही काळ्या पडल्या असत्या, तर प्रदूषणाचा परिणाम झाला, असे म्हणण्यास वाव होता. प्रयोगशाळेतील चाचण्यांशिवाय असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.
>सोनेचांदीचे दागिने काळे पडत आहेत. केवळ मूर्तीच काळी पडलेली नाही. प्रदूषणामुळेच हे होत आहे. - विद्या यादव,
गृहिणी, दावडी