ठाणे : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे सक्तीचे असल्याने हजारो इच्छुक सध्या ही वेबसाइट सर्च करत असल्याने सर्व्हर डाउन होऊन हा अर्ज भरण्याकरिता चारचार तास लागत आहेत. अजून एकाही मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसांत एकाच वेळी अर्ज भरण्यामुळे गोंधळ उडू शकतो, हे हेरून सर्वच राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आता त्यापैकी ज्यांना पक्षाचा ए-बी फॉर्म मिळेल, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अथवा मनसे कुठल्याही मोठ्या पक्षाने अजून आपल्या उमेदवारयाद्या जाहीर केलेल्या नाहीत. बंडखोरी टाळण्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर किंवा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर राजकीय पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करणार आहेत. गेल्या काही निवडणुकांचा हा शिरस्ता आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज दाखल करून त्याची प्रिंट काढून जर तो सादर करायचा असेल, तर गुरुवार-शुक्रवारी म्हणजे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्याकरिता वेबसाइटला भेट देतील आणि समजा सर्व्हर डाउन झाल्याने अनेकांना अर्ज भरता आला नाही, तर काही वॉर्डांत पक्षाचा अधिकृत उमेदवारच नाही, अशी पंचाईत होऊ शकते. हे हेरून राजकीय पक्षांनी प्रत्येक वॉर्डातील प्रमुख इच्छुकांना आॅनलाइन अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आहे. परिणामी, सोमवार-मंगळवारी वेबसाइटवर ताण येऊन सर्व्हर डाउन होऊन अर्ज भरण्यास चारचार तास लागले. चार पानांच्या अर्जात उमेदवाराला स्वत:ची माहिती देण्याबरोबरच मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपशील भरायचा आहे. अनेक उमेदवारांनी संगणकसाक्षरांची मदत घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी अर्ज भरले असून त्यात एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा समावेश आहे.आॅनलाइन अर्ज सर्वच इच्छुकांनी भरले असले, तरी ‘ए-बी’ फॉर्म एकाच्याच हाती पडणार असल्याने राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करून ठेवण्यास सांगितले असले, तरी ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते माघार घेणार का, हा सवाल आहे. कदाचित, या आॅनलाइनच्या गोंधळामुळे बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
‘आॅनलाइन’मुळे बंडखोरीला ऊत?
By admin | Published: February 02, 2017 3:03 AM