लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : नेत्यांनी आपापल्या मर्जीतील, कुटुंबातील-घरातील उमेदवारांचाच विचार केल्याने भिवंडीत सर्व पक्षांतील बंडखोरी उफाळून आल्याने इच्छुक धास्तावले आहेत. बंड शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी शब्द टाकण्यास; प्रसंगी साम, दाम, दंडाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. इच्छुकांची नावे जाहीर केली, तर गोंधळ उडेल या भीतीने कोणत्याही पक्षाने शुक्रवारी यादी जाहीर केली नाही आणि रात्री उशिरा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी, ६ मे रोजी शेवटचा दिवस आहे. एकाही पक्षाने यादी जाहीर न केल्याने उद्या दिवसभर अर्जांसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने ९० पैकी ७० जागांवर आघाडीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरच त्या आघाडीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. त्या दोन पक्षांचा आणि भाजपा-कोणार्क आघाडीचा काही जागांवर झालेला समझोता वगळता सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत. पण यातील एकही पक्ष सर्व जागा लढवणार नाही. शुक्रवारी दिवसभरात वेगवेगळ््या पक्षाच्या ५० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. ७० जागांवर आघाडी : भिवंडीच्या ९० जागांपैकी ४४ जागांवर समाजवादी पक्ष आणि २६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करून लढणार असल्याचे शुक्रवारी रात्री स्थानिक नेत्यांनी जाहीर केले. इतर छोटे पक्षही आघाडीत सहभागी होणार असल्याने त्यांच्यासाठी २० जागा ठेवल्याचा दावा त्यांनी केला. मात्र काँग्रेसमुळे धमर्निरपेक्ष आघाडी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काही प्रभाग पूर्णत: तर काही प्रभागात जागा वाटल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपातही संघर्षभाजपातील निष्ठावंत, संघाचे कार्यकर्ते आणि नवभाजपावाद्यांतील संघर्ष अजूनही पुरता शमला नसल्याचे दिसून आले. शनिवारी उमेदवारी जाहीर होताच त्या संघर्षाला पुन्हा तोंड फुटेल, अशी शक्यता आहे. पण याबाबत कोणतेही नेते बोलण्यास तयार नाहीत. काँग्रेसमध्येही फाटाफूट राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचे आघाडीची घोषणा केल्यानंतर उमेदवारी नाकारलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी त्यांच्या गटाकडे धाव घेतली आहे. काहींनी समाजवादीच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.काँग्रेसची सेना, भाजपाला रसद?मागील सत्ताकाळात काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला महापौरपदासाठी मदत केली. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपा खासदारांच्या बंगल्यावर, तर काही भादवडमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांकडे जाऊन वाटाघाटी करतात,असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी केला. काँग्रेस नगरसेवक जावेद दळवी यांनी भाजपा खासदारांकडे बसून शिवसेना-भाजपाला अपेक्षित पद्धतीने उमेदवार दिल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाचा सेनेवर डल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजापात प्रवेश केल्यानंतर अजूनही सेनेला धक्का देण्याचे भाजापाचे प्रयत्न सुरू आहेत. दोन-तीन वेळा संधी मिळूनही शिवसेनेतील ज्या नेत्यांनी आता प्रभागातील चारपैकी तीन जागांवर दावा केला, त्यांना भाजापाने गळाला लावले आहे. ंसेनेने उमेदवारी न दिल्यास त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले जाणार असल्याने शिवसैनिक संतापले आहेत. हा विषय स्थानिक नेत्यांनी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याकडे नेला. मात्र तेथेही तो न सुटल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्रभर आपल्या पद्धतीने हा विषय हाती घेतला. काँग्रेसच्या भ्रमावर टीका काँग्रेस हा भिवंडीतील मोठा पक्ष असला, तरी त्या पक्षाचे स्थानिक नेते अजूनही जुन्या भ्रमातून बाहेर येण्यास तयार नाही, असी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली. जागांबाबत त्यांच्या अवास्तव मागण्यामुळेच भिवंडीत त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे अकारण मतांची फाटाफूट होईल, असेही ते म्हणाले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांतही जागावाटपावरून मतभेद होते. पण मी स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलून आघाडीवर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंड उफाळले, इच्छुक धास्तावले
By admin | Published: May 06, 2017 5:59 AM