ठाणे : वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय महिला-पुरुष पदके मिळवत आहेत. क्रिकेटमध्येही आपली कामगिरी चांगली आहे. हे खेळाडू जन्माला आल्यापासून सुपरस्टार नव्हते. त्यांचीही सुरुवात मैदानांवरूनच झाली आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखा आणि ग्लॅमरच्या मागे धावू नका, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात दिला. यावेळी उपस्थितांनी ‘सचिन.. सचिन...’ची साद घालून त्याला दाद दिली.मुंब्रा-कौसा, सिमला पार्क येथील ठाणे महापालिका शाळेच्या पटांगणावर ठामपा आणि डीबीएस बँकेच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांची व्यवस्था केली आहे. त्याचे उद्घाटन मास्टर ब्लास्टरच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, ठामपा उपायुक्त मनीष जोशी, आमदार जितेंद्र आव्हाड, बँकेचे मुख्य कार्यकारी सुरोजित शोम आदी उपस्थित होते. यावेळी सचिन म्हणाला, ग्लॅमर दीर्घकाळ टिकणारे नसते. ग्लॅमरमागे धावाल तर, वय वाढल्यानंतर समजेल की, आपण कुठे आहोत. प्रत्येकाने आपले स्वप्न पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. आपण झोपतो तेव्हा स्वप्न बघतो; पण डोळे उघडतो तेव्हा नवी सुरुवात होते. ती सुरुवातच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते. खेळ खेळणे आवश्यक आहे. मुलांनीच नव्हे तर पालकांनीही खेळ खेळावेत. तुमच्याकडून ते शिकतील, तर त्यांच्याकडूनही तुम्हाला शिकण्यास मिळेल, असे सचिन यावेळी म्हणाला. यावेळी ठामपा विद्यार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मुलांमध्ये फुटबॉल सामना रंगला. तो सामना ठामपा विद्यार्थ्यांनी ०-१ ने जिंकला. त्यानंतर, ठामपाच्या मुलींचा एक सामना खेळवण्यात आला. सचिनचे स्वागत आधी ठाण्याच्या महापौर शिंदे यांनी आणि नंतर महापालिका अधिकाºयांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधींसह अन्य सचिनप्रेमींची क्रिकेटच्या देवासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली. देश-विदेशांत क्रिकेट सामन्यांच्या वेळी टीव्हीत दिसणारा सचिनचा एक चाहता मुंब्य्रातही आला होता. यावेळी त्याच्या हाती भारतीय ध्वज आणि शंख होता.
>पोलिसांचा चोख बंदोबस्तसचिन पहिल्यांदाच मुंब्रा-कौसा परिसरात येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, शीळ-डायघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सांवत यांच्यासोबत १००-१२५ असा पोलीस फौजफाटा तैनात होता.